दिंडोरी | प्रतिनिधी :- महाराष्ट्र शासनाच्या माझी वसुंधरा अभियान 6.0 या महत्त्वाकांक्षी पर्यावरण संवर्धन उपक्रमांतर्गत दिंडोरी तालुक्यातील खतवड ग्रामपंचायतीच्या वतीने विविध पर्यावरणपूरक उपक्रम राबविण्यात येत असून, ग्रामपंचायतीने सक्रीय सहभाग घेत गावाच्या शाश्वत विकासाच्या दिशेने ठोस पावले उचलली आहेत.
या अभियानांतर्गत गावातील अंतर्गत रस्त्यांच्या दुतर्फा वृक्षारोपण करण्यात आले असून, लावण्यात आलेल्या रोपांचे संवर्धन व्हावे यासाठी संरक्षक जाळ्या बसविण्यात आल्या आहेत. त्यामुळे वृक्षसंवर्धनाला चालना मिळून हरित गावाच्या संकल्पनेला बळ मिळाले आहे.
माझी वसुंधरा अभियान 6.0 चा मुख्य उद्देश पृथ्वी, जल, वायू, अग्नी व आकाश या पंचमहाभूतांवर आधारित हवामान बदलांना सामोरे जाण्यासाठी नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करणे तसेच शाश्वत जीवनशैलीला प्रोत्साहन देणे हा आहे. त्या अनुषंगाने खतवड ग्रामपंचायतीच्या पुढाकाराने मविप्र दिंडोरी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या सहभागातून पर्यावरण संवर्धनासाठी सौर ऊर्जेचा वापर या विषयावर जनजागृती करण्यात आली.
हवामान बदलांवर मात करण्यासाठी नाविन्यपूर्ण उपाययोजनांना प्रोत्साहन देणे, तसेच पंचमहाभूतांवर लक्ष केंद्रित करून शाश्वत विकास साधण्यावर या अभियानात भर देण्यात आला आहे. नागरिकांनी पर्यावरण संरक्षणाची शपथ घ्यावी, यासाठी विविध माध्यमांतून जनजागृती करण्यात येत आहे.
ग्रामपंचायत माध्यमातून अभियानाची प्रभावी अंमलबजावणी होत असून, भेटी देऊन व सोशल मिडिया च्या माध्यमातून नागरिकांना या अभियानात सक्रीय सहभाग घेण्याचे आवाहन केले जात आहे.
अभियानांतर्गत खतवड येथे वायू गुणवत्ता चाचणी यंत्राद्वारे हवेचे परीक्षण करून नागरिकांना पर्यावरण विषयक सखोल माहिती व मार्गदर्शन करण्यात येत आहे. तसेच सेंद्रिय शेती व रासायनिक विरहित अन्नधान्य उत्पादनास प्रोत्साहन देण्यासाठी करवे समाज सेवा संस्था, पुणे यांच्या सहयोगाने परसबागेसाठी भाजीपाला बियाणे व सेंद्रिय खतांचे वितरण करण्यात आले.
यासोबतच ओला व सुका कचरा विलगीकरण, कचऱ्याचे विघटन, तसेच प्लास्टिक वापरावर बंदी या विषयांवर जनजागृती करण्यात येत असून ,स्वच्छता व पर्यावरण रक्षणाच्या दृष्टीने राष्ट्रीय पातळीवरील संकल्पना नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.
माझी वसुंधरा अभियान 6.0 हे महाराष्ट्राला अधिक पर्यावरणपूरक व शाश्वत बनवण्यासाठी उचललेले महत्त्वाचे पाऊल असून, दिंडोरी तालुक्यातील खतवड ग्रामपंचायतीच्या या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. पर्यावरण संरक्षणासाठी प्रत्येक नागरिकाचा सहभाग आवश्यक असल्याचे या माध्यमातून अधोरेखित करण्यात आले आहे.