महाराष्ट्र ट्रायबल न्युज

लाल वादळ नाशिकच्या वेशीवर धडकणार

दिंडोरी | मनोज पाटील:- किसान सभेच्या शेतकरी, शेतमजूर व आदिवासी बांधवांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी दिंडोरी तहसील कार्यालयासमोर सुरू असलेले बिर्‍हाड व चक्काजाम आंदोलन सहाव्या दिवशीही सुरूच असून, जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याचा ठाम निर्धार आंदोलनकर्त्यांनी केला आहे. आंदोलनाने आता निर्णायक वळण घेतले असून मुंबईकडे कूच करण्याचा निर्णय झाल्याने सुरगाणा, कळवण, पेठ, चांदवड तालुक्यातील हजारो आंदोलनकर्ते दिंडोरीत जमा होत आहेत. त्यामुळे दिंडोरी तहसील कार्यालय परिसराला यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले आहे.
हातात लाल झेंडे घेतलेले अबालवृद्ध, महिला, युवक मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी झाले असून ‘लाल झेंडा’, ‘लाल सलाम’च्या घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला आहे. या घोषणांमुळे दिंडोरी परिसर अक्षरशः लाल वादळात सापडल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
नाशिक जिल्हा किसान सभा, माकप, डीवायएफएस व जनवादी महिला संघटनांच्या वतीने शेतकरी, कष्टकरी, कामगारांच्या विविध मागण्यांसाठी हे आंदोलन सुरू आहे. कडाक्याची थंडी, अंधारी रात्र आणि दिवसाचे तळपते ऊन अंगावर घेत आंदोलकांनी रस्त्यावरच ठाण मांडले आहे. रस्त्यावरच तीन विटांची चूल पेटवून खिचडी शिजवली जात असून, घरदार मागे टाकून हक्कासाठीचा लढा अधिक तीव्र करण्याचा निर्धार आंदोलनकर्त्यांनी केला आहे.
दरम्यान, सुरगाणा तालुका किसान सभेचे लाल वादळ कॉ. जे. पी. गावित यांच्या नेतृत्वाखाली बोरगाव येथून पायी नाशिकच्या दिशेने रवाना झाले होते. पांडाणे येथे मुक्कामानंतर सुमारे सहा ते सात हजार आंदोलक पुन्हा नाशिककडे कूच करत असून, आज सायंकाळीपर्यंत हे लाल वादळ नाशिकच्या वेशीवर धडकण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांच्या ज्वलंत प्रश्नांवरील रास्त मागण्या असूनही जिल्हा प्रशासन व राज्य सरकारकडून कोणतीही ठोस दखल घेतली जात नसल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे. शिष्टमंडळाला उडवा-उडवीची उत्तरे मिळाल्याने आंदोलनाचे नेतृत्व करणारे कॉ. जे. पी. गावित यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.
फसव्या व विश्वासघातकी सरकारविरोधात आरपारची लढाई लढण्याचा निर्धार आंदोलनकर्त्यांनी केला असून, यावेळी मागे न हटता आपल्या हक्कांसाठी संघर्ष अधिक तीव्र करण्याचा पक्का निर्धार केल्याने आंदोलनकर्त्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. लाल झेंड्यांच्या साक्षीने निघालेल्या या आंदोलनामुळे नाशिक जिल्ह्यात मोठ्या आंदोलनाची चाहूल लागली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने