महाराष्ट्र ट्रायबल न्युज

हिरडी जिल्हा परिषद शाळेला खोटरे कुटुंबाकडून ६५ इंच स्मार्ट स्क्रीन भेट; वडिलांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त अनोखा उपक्रम

खोकरविहीर l प्रतिनिधी:- समाजहिताचा वारसा जपत आणि ज्ञानाचा दिवा सतत तेवत ठेवण्याच्या उद्देशाने, निसर्गवासी लक्ष्मण नारायण खोटरे (माजी मुख्याध्यापक, आश्रम शाळा) यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त हिरडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला शैक्षणिक साहित्याची मोठी भेट देण्यात आली. खोटरे कुटुंबाने सामाजिक बांधिलकी जपत शाळेला ६५ इंच स्मार्ट इंटरअ‍ॅक्टिव्ह स्क्रीनसह अन्य साहित्य प्रदान करून एक नवा आदर्श समाजासमोर ठेवला आहे.
     निसर्गवासी लक्ष्मण नारायण खोटरे यांनी आपल्या कारकिर्दीत कनाशी, चणकापूर, पळसण, देवरगाव, रामेश्वर यांसह अनेक आदिवासी शासकीय आश्रम शाळांमध्ये ज्ञानदानाचे पवित्र कार्य केले. त्यांच्या निधनानंतर, त्यांचा हा वारसा त्यांचे चिरंजीव गितेश्वर लता लक्ष्मण खोटरे (HAL, नाशिक) आणि संपूर्ण खोटरे कुटुंबाने पुढे चालवला आहे. २ जानेवारी २०२६ रोजी त्यांच्या स्मृती जपण्यासाठी शाळेतील विद्यार्थ्यांना स्पोर्ट्स ड्रेस, नोटपॅड, नोटबुक, पेन, पेन्सिल आणि रंगपेटी अशा साहित्याचे वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. या उपक्रमामुळे शाळेतील तंत्रस्नेही शिक्षणाला गती मिळणार असून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी ही मदत मोलाची ठरणार आहे. यावेळी सर्व विद्यार्थी आणि उपस्थितांसाठी स्नेहभोजनाचे देखील आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाला हिरडी गावच्या सरपंच सौ. यशोदाताई पोपट खोटरे, उपसरपंच हिरामण खोटरे, ग्रामसेवक भाऊसाहेब बागुल, पोलीस पाटील सुनील खोटरे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संजय खोटरे, उपाध्यक्ष शंकर महाले आणि सर्व सदस्य उपस्थित होते. तसेच सामाजिक कार्यकर्ते खंडेश्वर खोटरे, नरेश खोटरे, ज्योश फाऊंडेशनचे उमाळे सर, आदिवासी बचाव अभियानचे सरचिटणीस किसन ठाकरे, कोकणा समाज राज्याध्यक्ष जयवंत गारे, राकेश दळवी, देविदास कामडी, संजय गवळी, गौतम जाधव, नितीन पाटील यांसह विविध संघटनांचे पदाधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आहेर मॅडम यांनी केले, तर मुख्याध्यापक भदाणे सर आणि पुपलवाड सर यांनी खोटरे कुटुंबाच्या या दातृत्वाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. पुपलवाड सरांनी उपस्थितांचे आभार मानले. लक्ष्मण नारायण खोटरे यांच्या स्मृतीनिमित्त राबवण्यात आलेल्या या उपक्रमामुळे हिरडी शाळेच्या विकासाची एक नवीन पहाट सुरू झाल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने