खोकरविहीर l प्रतिनिधी:- शनिवार,दि. ०३ जानेवारी २०२६ रोजी डांग सेवा मंडळ संचलित, दादासाहेब बिडकर महाविद्यालय, पेठ येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. यानिमित्ताने महाविद्यालयातील क्रीडा संचालक डॉ नरेंद्र पाटील यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आपले विचार व्यक्त करत आज अनेक क्षेत्रात स्त्रीयांनी घेतलेली झेप व समाजातील कर्तृत्ववान महिलांची माहिती विद्यार्थ्यांना दिली.
महाविद्यालयातील विद्यार्थी हुशार धुम यांने त्याकाळची सावित्रीबाईंना मुलींना शिक्षण देण्यासाठी समाजातील विरोधकांचा किती जाच सहन करावा लागला, तरी देखील त्यांनी आपले कार्य चालूच ठेवले. आजच्या सावित्रीच्या लेकी मात्र ग्रामीण भागात शिक्षणाकडे गांभीर्याने लक्ष देत नसल्याची खंत यानिमित्ताने हुशार धुम या विद्यार्थ्यांने व्यक्त केली. प्राध्यापिका प्रतिभा शिरसाठ यांनी आज मुल-मुली समानतेने शिक्षण घेत आहेत.प्रत्येक क्षेत्रात मुलींची प्रगतीची टक्केवारी मुलांपेक्षा जास्त होतांना दिसत आहे.प्रत्येकाने शिक्षणाला महत्त्व देऊन आपल्या समाजाचा विकास घडवून आणला पाहिजे, असे विचार व्यक्त केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ गणेश रुपवते यांनी इतिहासातील स्त्री शिक्षणाचे व सेवा व्रताचे उदाहरण म्हणजे सावित्रीबाई फुले यांच्या कार्यक्रम कर्तृत्वाचा व प्लेग च्या साथीच्या काळात त्यांचे योगदान, शिक्षणाविषयी, सामाजिक प्रश्नाविषयी अनेक पाश्चात्य विचारवंताना त्यांच्या कार्याची प्रेरणा मिळाली, महाराष्ट्रातील अनेक वीर महान विभुतींना यानिमित्ताने विनम्र अभिवादन देत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. गणेश मोरे यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्राध्यापिका रचना राऊत यांनी केले.
या कार्यक्रमात महाविद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी वृंद व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.