दिंडोरी । प्रतिनिधी:- दिंडोरी शहरातील अरुणोदय सार्वजनिक वाचनालयाच्या दोन विद्यार्थ्यांनी गरिबीवर मात करत भारतीय संरक्षण पोलीस दलात प्रवेश केला असून दोघांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
दिंडोरी येथील अरुणोद्य सार्वजनिक वाचनालयात शिकणारे विशाल गांगोडे व भूषण बेंडकुळे या दोघांनी यश संपादन केले आहे. दोघांनीही गेल्या दोन वर्षांपासून स्पर्धा परीक्षांचा अभ्यास सुरू केला होता. भूषण बेंडकुळे हा नाईकवाडी ता. नाशिक येथील असून वडील आणि आई दोघेही हमालीचे काम करायचे. वडील हमाली करायचे तर आई दुसर्यांच्या घरी धुणी भांडे करून भूषणला अभ्यासासाठी पैसे पाठवायचे. त्याने आईचे कष्ट पाहिले होते. वडिलांचे कष्ट पाहिले होते. त्यामुळे यश मिळवायचे असा निश्चय केला होता. दुसरा विद्यार्थी विशाल अर्जुन गांगोडे हा वाघाड येथील विद्यार्थी असून त्याने दोन वर्षांपासून दिंडोरी शहरात येऊन अभ्यास केला. सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत लायब्ररीमध्ये अभ्यास करायचा. घरची परिस्थिती जेमतेम असल्याने त्यांनी बराच खर्च टाळला. त्याचबरोबर त्याचे वडील शेतीकाम करून त्याला पैसे पुरवायचे. त्यांची निवड केंद्रीय राखीव पोलीस दलात झाली आहे. दोघांचाही अरुणोदय सार्वजनिक वाचनालयाचे संचालक तथा दिंडोरी नगरपंचायतीचे नितीन गांगुर्डे व ज्येष्ठ पत्रकार अशोक केंग यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. अशोक केंग यांनी दोघांनाही शुभेच्छा दिल्या. दोघे विद्यार्थ्यांच्या कष्टाची जाणीव ही महत्त्वपूर्ण ठरली असून इतर विद्यार्थ्यांनी त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून यश मिळवावे असे आवाहन वाचनालयाचे संचालक तथा नगरसेवक नितीन गांगुर्डे यांनी केले. भूषण बेंडकुळे व विशाल गांगोडे यांनी दोघांनी अरुणोद्य वाचनालयाचे आभार मानले व आपला कष्टाचा प्रवास सांगताना त्यांना आई-वडिलांचे कष्ट आठवले ते सांगत असतानाच दोघांच्या डोळ्यात पाणी आले यामुळे वातावरण भारावून गेले होते संयोजन ग्रंथपाल सोमनाथ थोरात यांनी केले यावेळी वाचनालयाचे विद्यार्थी उपस्थित होते.