महाराष्ट्र ट्रायबल न्युज

संत निवृत्तीनाथ यात्रेनिमित्त दुमदुमली शेपुझरी नगरी*पार नदीकाठी लाखो भाविक भक्तांची मांदियाळी.

बा-हे l नामदेव पाडवी :- षटतिला एकादशी निमित्ताने शेपुझरी येथे संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज यात्रा माेठ्या उत्साहात पार पडली. नाशिक जिल्ह्यातील पेठ - सुरगाणा तालुक्यातील पार नदी काठावरील शेपुझरी येथे मोठी यात्रा भरली हाेती. यात्रेनिमित्ताने पेठ, सुरगाणा, दिंडोरी, कळवण तालुक्यासह, डांग जिल्ह्यासह, गुजरात राज्यातील धरमपुर, कपराड, सुतारपाडा आदी भागातील लाखो भाविक भक्त दर्शनासाठी दाखल झाल होते. टाळमृदूंगाच्या गजरात शेपुझरीचा परिसर दुमदुमून निघाला. 
    पेठ व सुरगाणा तालुक्याच्या सीमेवर वसलेल्या शेपुझरीत घनदाट जंगलाच्या सानिध्यात शेपुझरी येथे पार नदी तीरावर भगवान शंकराचे पुरातन मंदिरासह पाण्याचा बाराही महिने वाहणारा जीवंत झरा या ठिकाणी आहे. यासह संत मंदाकिनी महाराजांचे मंदिर आहे. याचबराेबर सुरगाणा तालुक्यातील कहांडाेळपाडा शिवारात नदीच्या कडेला संत निवृत्तीनाथांचे मंदिर आहे. या ठिकाणी भरलेल्या यात्रेस मोठ्या प्रमाणात भाविकांनी गर्दी केली हाेती. दोन दिवसांपासून इथे दिंडी घेऊन वारकऱ्यांसह, भाविकांची माेठी गर्दी पाहायला मिळाली. गळ्यात तुळशीमाळ, डोक्यावर तुळशीवृंदावन, हाती टाळ मृदुंग, भगव्या पताका घेतलेल्या हजारो वारकऱ्यांनी शेपुझरीनगरी गजबजून गेली. शेपुझरीत वारकऱ्यांसह युवक - युवतींची संख्या लक्षणीय प्रमाणात पाहायला मिळाली. शिवमंदिराच्या दर्शनासाठी लांबच लांब रांग लागली हाेती. सुरगाणा तालुक्यातून येणाऱ्या भाविकांच्या खासगी वाहनचालकांना आतमध्ये वाहने नेण्यास मनाई करण्यात आली होती. वाहनचालकांसाठी सुरगाण्यातील कहांडोळपाडा परिसरात तीन ठिकाणी खासगी पार्किंगची सोय केली होती. यासह पेठ तालुक्यातून येणाऱ्या वाहनांसाठी चाैकडा येथे वाहनतळ उभारण्यात आला हाेता. यात्रेसाठी प्रसाद, खेळणी, खाऊच्या दुकानांसह गरजेच्या वस्तूंची अनेक दुकाने लावण्यात आली होती. यात्रेसाठी होणार्‍या गर्दीच्या पार्श्वभूमीवर बाऱ्हे पोलीस ठाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रदीप गीते यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. प्राथमिक आरोग्य केंद्र बा-हे आरोग्य अधिकारी डॉ.अपेक्षा जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली समुदाय आरोग्य अधिकारी मनिष गाडगीळ, आरोग्य सेवक पवन भांगे, आरोग्य सेविका शितल गवळी यांनी यशस्वीरित्या आरोग्य सेवेची कामगिरी बजावली. बा-हे पोलीस ठाणे हद्दीतील पोलीस पाटील व मोफत पोलीस प्रशिक्षण केंद्र बा-हे येथील प्रशिक्षणार्थी विद्यार्थी यांनी स्वयमसेवकाची भूमिका बजावली.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने