दिंडोरी । प्रतिनिधी :-लखमापूर फाटा ते भनवड रस्त्याची अतिशय दयनीय अवस्था झाली असून तातडीने सार्वजनिक बांधकाम विभागाने या रस्त्याची दुरुस्ती करण्यात यावी, अन्यथा लखमापूर फाटा येथे रास्ता रोको करण्यात येईल, इशारा माजी आमदार धनराज महाले व शिवसेनेच्या पदाधिकार्यांनी दिला आहे.
माजी आमदार धनराज महाले यांनी दिलेल्या प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे की, गेल्या काही दिवसांपासून सार्वजनिक बांधकाम अधिकार्यांशी चर्चा करतात रस्ता मंजूर आहे. लवकरच काम सुरू होईल, अशा प्रकारचे उत्तर मिळतात. परंतु रस्ता काही काम सुरू होत नाही. वेळोवेळी लोकप्रतिनिधी यांच्याशी बोलणं झालेला आहे, परंतु कुठल्याही प्रकारचा मार्ग निघत नाही. आज रस्ता बघितला तर अनेक छोटे -मोठे अपघात होत आहेत. मोठ्या प्रमाणात इंडस्ट्रियल ऊस व इतर वाहतूक असल्याने मोठ्या प्रमाणात सर्वसामान्य जनतेला त्याचा त्रास होत आहे. त्याचप्रमाणे रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्याने प्रवाशी वर्गांना शारीरिक आजारांना सामोरे जावे लागत आहे. तसेच वाहनाचेही नुकसान होत असल्याने वाहनचालकांना आर्थिक भुर्दंड बसत आहे. तरी येणार्या पंधरा दिवसांत रस्त्याचे काम सुरू झाले नाही तर शिवसेना पक्षाच्या वतीने व सर्वसामान्य जनतेच्या वतीने लखमापूर येथे रास्ता रोको करण्यात येईल व याची सर्वस्वी जबाबदारी ही सार्वजनिक विभाग म्हणून आपल्यावर राहील, असेही माजी आमदार धनराज महाले व शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिकांनी सांगितले आहे.