महाराष्ट्र ट्रायबल न्युज

अपयश ही पराभवाची नव्हे, तर यशाकडे नेणारी पायरी- प्रवीण नाना जाधव

दिंडोरी l प्रतिनिधी:- यश मिळविण्यासाठी जिद्द ,चिकाटी व संघर्ष करून विद्यार्थ्यांनी मेहनतीच्या जोरावरच यश संपादन करावे व अपयश ही पराभवाची नव्हे, तर यशाकडे नेणारी पायरी असल्याचे प्रतिपादन मविप्र संचालक प्रवीण नाना जाधव यांनी केले.
मराठा विद्या प्रसारक समाजाचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, दिंडोरी येथे विद्यार्थी गुणगौरव सोहळा उत्साहात पार पडला.
   त्या प्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावावरून प्रवीण नाना बोलत होते.ते पुढे म्हणाले 
दुसऱ्यांच्या यशाकडे पाहून निराश न होता स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवा.
आजच्या स्पर्धात्मक युगात केवळ पुस्तकी ज्ञान पुरेसे नाही. विद्यार्थ्यांनी आपल्या सुप्त कलागुणांना ओळखून त्यांना वाव दिला पाहिजे. कला, क्रीडा, संशोधन, उद्योजकता अशा विविध क्षेत्रांतूनही उज्ज्वल भविष्य घडवता येते. प्रत्येक विद्यार्थ्याने आत्मविश्वास बाळगून स्वयंपूर्ण बनण्याचे ध्येय समोर ठेवावे. शिस्त, वेळेचे नियोजन आणि सातत्य या मूल्यांची जोपासना केल्यास यश नक्कीच तुमच्या पायाशी येईल.
महाविद्यालय केवळ शिक्षण देणारी संस्था नसून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचे केंद्र आहे.
 कार्यक्रमाच्या प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज व विद्येची देवता सरस्वती यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते कवी, लेखक व गीतकार प्रशांत केंदळे होते. त्यांनी आपल्या प्रभावी भाषणातून विविध कवितांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची सामाजिक, राजकीय व आर्थिक जडणघडण कशी झाली पाहिजे, यावर प्रकाश टाकला. यश मिळाल्यावर आभाळात उडून जाऊ नये आणि अपयश आल्यावर कोपऱ्यात जाऊन बसू नये, असा मोलाचा सल्ला त्यांनी दिला. तसेच यश–अपयशाला सामोरे जाण्याची मानसिकता व वर्तमान परिस्थितीशी सामना कसा करावा, याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
यावेळी मविप्र संचालक प्रवीण नाना जाधव, प्रमुख वक्ते कवी प्रशांत केंदळे,नगराध्यक्ष सुनीता लहागे, नगरसेवक सूजित मुरकुटे, प्रशांत पाटील, संतोष पाटील, खतवडचे उपसरपंच सुखदेव खुर्दळ,शेतकरी संघाचे व्हा चेअरमन संतोष कथार, ग्रामीण साहित्य संमेलन चे अध्यक्ष तुषार वाघ, डॉ. शिल्पा देशमुख, बापू चव्हाण, भगवान गायकवाड, अशोक निकम , प्राचार्य डॉ. व्ही. बी. कदम आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. व्ही. बी. कदम यांनी केले. त्यांनी वर्षभरात राबविण्यात आलेल्या विविध शैक्षणिक, सांस्कृतिक व क्रीडा उपक्रमांचा आढावा सादर केला.
यावेळी आदर्श शिक्षक पुरस्कार प्रा. एस. एस. पागे यांना, तर आदर्श शिक्षकेतर कर्मचारी म्हणून संतोष पगार व बाजीराव चौधरी यांना प्रदान करण्यात आला. आंतरराष्ट्रीय परिषदेत शोधनिबंध सादर व पुस्तक प्रकाशनाबद्दल डॉ. डी. के. लोंढे, तसेच विद्यावाचस्पती (Ph.D.) पदवी संपादन केल्याबद्दल डॉ. अजित मेधाने व डॉ. योगेश जाधव यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
महाविद्यालयात स्नेहसंमेलन व वर्षभरात आयोजित विविध क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धांमध्ये विजयी ठरलेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे, ट्रॉफी व पदके देऊन गौरविण्यात आले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सकाळ उपप्राचार्य प्रा. आर. आर. झोमन, सकाळसत्र प्रमुख गौरव सोमवंशी, सांस्कृतिक प्रमुख प्रा. प्रतीक्षा गरुड, स्नेहसंमेलन प्रमुख अजय निकम, शारीरिक शिक्षण संचालक डॉ. रविंद्र चव्हाण, प्रा. अनिरुद्ध भगत, प्रा. महेंद्र बागुल, प्रा. प्रियांका गारे, प्रा. एम. वाय. शहा, प्रा. एस. एस. गटकळ व कार्यालय प्रमुख संतोष पगार यांनी विशेष परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. बलराम कांबळे व प्रा. सायली होळकर यांनी केले, तर आभार प्रदर्शन डॉ. अजित मेधने यांनी केले. या कार्यक्रमाला महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने