दिंडोरी l प्रतिनिधी:- कादवा म्हाळुंगी (ग्रामपंचायत) येथील अंगणवाडी केंद्रात Pernod Ricard India Foundation व Ecosan Services Foundation यांच्या संयुक्त विद्यमाने पाणी सुरक्षा नियोजन (Water Safety Plan) विषयक प्रशिक्षण आयोजित करण्यात आले. तसेच Pernod Ricard India Foundation व Child Survival India Foundation यांच्या मार्फत हिमोग्लोबिन तपासणी शिबिरही घेण्यात आले.
प्रशिक्षणाच्या प्रारंभी पाण्याचे महत्त्व व जलसुरक्षा योजना (WSP) याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. जलसुरक्षा योजना ही स्त्रोतांपासून घरापर्यंत सुरक्षित व स्वच्छ पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे यासाठी World Health Organization (WHO) यांनी सुचविलेली पद्धत आहे. या योजनेत उपाययोजना करण्यापेक्षा संभाव्य धोक्यांची आधीच ओळख करून त्यावर प्रतिबंधात्मक उपाय करण्यावर भर दिला जातो.
ग्रामीण भागात पाणीपुरवठा सुधारण्यासाठी, आरोग्यदृष्ट्या सुरक्षित वातावरण निर्माण करण्यासाठी व ग्रामपंचायतीची पाणी व्यवस्थापन क्षमता मजबूत करण्यासाठी ही योजना उपयुक्त ठरते. जलसुरक्षा योजनेमुळे पाणीपुरवठा व्यवस्थेमधील धोके ओळखणे, पाणी स्वच्छ ठेवण्यासाठी व प्रदूषण टाळण्यासाठी कृती आराखडा तयार करणे, ग्रामपंचायत व ग्रामजल स्वच्छता समिती (VWSC) यांना प्रशिक्षण देणे तसेच स्वच्छता, पाणी हाताळणी व वापर याबाबत जागरूकता वाढविणे शक्य होते.
या योजनेमुळे गावात स्वच्छ पिण्याचे पाणी उपलब्ध होऊन अतिसार, कॉलरा, टायफाईड यांसारख्या जलजन्य आजारांमध्ये घट होण्यास मदत होते. विशेषतः महिला व मुलांचे आरोग्य सुधारण्यास हातभार लागतो. नियमित तपासणी व देखभाल यामुळे पाणीपुरवठा व्यवस्था टिकाऊ राहते व ग्रामपंचायतीची कार्यक्षमता वाढते.
प्रशिक्षणादरम्यान सॅटेलाइट नकाशाच्या सहाय्याने गावातील पाणी स्रोत व संसाधनांचा आढावा घेण्यात आला. तसेच कार्ड खेळाच्या माध्यमातून स्रोत, शुद्धीकरण, वितरण, साठवणूक व वापर या टप्प्यांतील संभाव्य धोके समजावून सांगण्यात आले. प्रशिक्षणापूर्वी व प्रशिक्षणानंतर ग्रामस्थांकडून प्रश्नावली भरून घेण्यात आली. पाणी नमुने तपासणीही करण्यात आली. पाणी सुरक्षा समिती व वॉटर चॅम्पियन यांच्या माध्यमातून गावात पाणी व्यवस्थापन संकल्पनेवर काम करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली.
याचवेळी हिमोग्लोबिन तपासणी शिबिर घेऊन ग्रामस्थांची आरोग्य तपासणी करण्यात आली. या उपक्रमाला गावकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
या प्रसंगी इकोसॅन सर्व्हिसेस फाउंडेशनचे वरिष्ठ प्रकल्प व्यवस्थापक आदित्य भेडसगावकर, प्रकल्प व्यवस्थापक सानिका घळसासी, टेक्निकल टीमचे साजन गुळवे व त्यांचा फील्ड स्टाफ, ग्रामपंचायत अधिकारी जाधव सर, अंगणवाडी मदतनीस मंगल लांडे, आशा सेविका पूजा चौरे, आरोग्य सेविका जोसना तोरडे तसेच चाइल्ड सर्वायवल इंडिया फाउंडेशनचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अमोल येवला, फार्मासिस्ट पवन सोनवणे, हेल्थ एज्युकेटर प्रियंका चव्हाण आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.