महाराष्ट्र ट्रायबल न्युज

प्रथम इन्फॉटेक फाऊंडेशन आयोजित सुरगाणा तालुक्यातील ५२ शाळांमध्ये ‘रिडींग चॅम्पियन’ उपक्रम उत्साहात संपन्न

बाऱ्हे l नामदेव पाडवी:- प्रथम इन्फॉटेक फाऊंडेशन यांच्या वतीने सुरगाणा तालुक्यातील तब्बल ५२ शाळांमध्ये रिडींग चॅम्पियन हा उपक्रम यशस्वीरित्या राबविण्यात आला. विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण करणे, नियमित वाचनाची सवय लावणे आणि प्रत्येक मुलाच्या हातात पुस्तक पोहोचवणे हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश होता.
     या कार्यक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना विविध गोष्टींची पुस्तके उपलब्ध करून देण्यात आली. तसेच वाचन स्पर्धा, गोष्टीवाचन, वाचनानंतर चर्चा आणि समज चाचणी अशा विविध उपक्रमांद्वारे मुलांचा सक्रिय सहभाग वाढविण्यात आला. शिक्षकांनीही विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देत वाचन संस्कृती रुजविण्यासाठी मार्गदर्शन केले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास वाढला असून वाचनाबद्दल सकारात्मक दृष्टीकोन तयार झाला आहे. अनेक शाळांमध्ये विद्यार्थ्यांनी नियमित वाचनाची सवय लावण्याचा संकल्प केला आहे. सदर उपक्रमामुळे तालुक्यात वाचन चळवळीला चालना मिळाली असून पालक व शिक्षकांकडूनही समाधान व्यक्त करण्यात आले आहे. भविष्यातही अशा शैक्षणिक उपक्रमांद्वारे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास घडविण्याचा संस्थेचा मानस आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने