इगतपुरी l विक्रम वारुंगसे :-दिनांक १३ ऑगस्ट २०२६ रोजी देशभरात सुरू असलेल्या 'हर घर तिरंगा' अभियानांतर्गत घोटी बु. येथे एका भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले. या रॅलीदरम्यान नाशिक ग्रामीण पोलीस दल आणि घोटी पोलीस स्टेशनच्या वतीने अमली पदार्थ सेवनाविरोधात जनजागृती मोहीम राबवून "ड्रग्सला नाही म्हणा, एक पाऊल उज्वल भविष्याकडे" हा महत्त्वाचा संदेश देण्यात आला.
ढोल-ताशांच्या गजरात, देशप्रेमी गाणी आणि 'भारत माता की जय'च्या जयघोषात निघालेल्या या रॅलीमध्ये आदर्श कन्या विद्यालय, जनता विद्यालय व रामराव नगर जि.प. शाळेतील हजारो विद्यार्थी, शिक्षक तसेच विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
भाजप जिल्हाप्रमुख सुनीलजी बच्छाव, अण्णासाहेब डोंगरे, प्रफुल्ल शेट कुमट यांच्यासह अनेक प्रमुख मान्यवर या वेळी उपस्थित होते. रॅलीच्या मार्गावर कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस निरीक्षक विजय शिंदे, पोलीस हवलदार गौरव सोनवणे, महिला PSI सुरेखा देवरे, पोलीस हवलदार गुरुदेव मोरे, पोलीस शिपाई निलेश साळवे, व पोलीस पथकाने चोख बंदोबस्त लावला. राष्ट्रगीताने या शानदार कार्यक्रमाची सांगता झाली, तर पोलिसांनी तरुणाईला नशेपासून दूर राहण्याचे आवाहन करत उज्वल भविष्याचा संदेश दिला.