पालघर l सौरभ कामडी :- दि. १५ ऑगस्ट २०२६ स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून ग्रुप ग्रामपंचायत कारेगाव-कोचाळे अंतर्गत येणाऱ्या तिन्ही शाळांमधील २७८ विद्यार्थ्यांना शाळोपयोगी शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. लिंगायत संघर्ष समिती व लिंगायत फाउंडेशन, नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने हा सामाजिक उपक्रम जिल्हा परिषद आयएसओ शाळा, कोचाळे येथे उत्साहात पार पडला.
ग्रुप ग्रामपंचायत कारेगाव-कोचाळेचे सरपंच मुरलीधर कडू व त्यांचे बंधू वैभव कडू यांच्या प्रयत्नातून या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांना स्कूल बॅग, वह्या, पेन, पेन्सिल, कंपास पेटी, पाण्याची बाटली आदी शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदतीचा हात देत सामाजिक बांधिलकी जपणारा हा उपक्रम राबविण्यात आला.
कार्यक्रमाला लिंगायत फाउंडेशनचे संस्थापक अनंत ददणे, लिंगायत संघर्ष समितीचे अध्यक्ष संदीप झारेकर, चिटणीस सुधीरजी भुसारे, समितीचे सदस्य तसेच मोखाडा तालुक्याचे माजी सभापती प्रदीप वाघ, किनिस्ते गावचे सरपंच योगेश दाते, सदस्य हनुमंत फसाळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
तसेच कोचाळे शाळेचे मुख्याध्यापक दिनकर फसाळे व शिक्षक राजाराम जोशी यांच्यासह विद्यार्थी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचे हास्य फुलले. ग्रामीण व आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देत त्यांच्या शिक्षणाला प्रोत्साहन देण्याचा हा उपक्रम कौतुकास्पद ठरला.