खोकरविहीर l प्रतिनिधी :- नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्याच्या डोंगरदऱ्यांमध्ये जपली गेलेली आदिवासी कला, संस्कृती आणि परंपरेचा समृद्ध वारसा आता देशाच्या राष्ट्रीय व्यासपीठावर दिमाखात झळकू लागला आहे. कोलकाता येथील सिटी सेंटर-२ येथे दि. २१ ते २३ ऑगस्ट २०२६ दरम्यान आयोजित हॅण्डलूम व हॅण्डिक्राफ्ट प्रदर्शनात महाराष्ट्राच्या आदिवासी कलाकारांनी आपल्या पारंपरिक कलांचे सादरीकरण करून कलकत्तावासीय प्रेक्षकांची मने जिंकली.
महाराष्ट्र राज्य पर्यटन विभाग, नाशिक यांच्या माध्यमातून सुरगाणा तालुक्यातील पिंपळसोंड येथील तातापाणी माता कणसरा बोहाडा कलापथक, श्रीभुवन-चिंचपाडा येथील आदिवासी सांस्कृतिक कलापथक यांच्या ढोल-पावरी, ठाकर व डांगी नृत्याने, तसेच बोहाडा/भोवाडा सोंगी मुखवटे नृत्याने कोलकात्याच्या कलामंचावर महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीची अनोखी झलक सादर केली.
ढोल-पावरीच्या सप्तसुरांनी आणि रंगीबेरंगी सोंगी मुखवट्यांनी उपस्थित प्रेक्षकांचे विशेष लक्ष वेधून घेतले. महाराष्ट्रासह राजस्थान, पश्चिम बंगाल, ओडिशा, झारखंड आणि छत्तीसगड या राज्यांतील लोककलाकार व हस्तकला कलाकारांनीही या प्रदर्शनात सहभाग घेतला.
या सांस्कृतिक सोहळ्यात सुरगाण्याचे पावरी वादक गणपत चौधरी, काशिनाथ चौधरी, हरी चौधरी, सुनील बंगाळ, परशराम बंगाळ, काशिनाथ बंगाळ, हेमंत बंगाळ, हरी बंगाळ, बबन गावित, शिवाजी महाले, तसेच भारती भोये, तुळशा राऊत, वसंती महाले, कविता बंगाळ, यशोदा बंगाळ यांच्यासह डहाणू-गंजाड येथील वारली चित्रशैलीचे गणपत दुमाडा, बोहाडा कलापथकाचे रतन चौधरी, हर्षाली चौधरी आदी कलाकारांनी सहभाग घेतला.
गावकुसातील कला थेट राष्ट्रीय व्यासपीठावर
या उपक्रमामुळे महाराष्ट्राची लोकधारा, लोककला, हस्तकला, पारंपरिक पेहराव, खाद्यसंस्कृती आणि आदिवासी जीवनपद्धती देशाच्या विविध भागांपर्यंत पोहोचत आहे. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ (MTDC) आणि महाराष्ट्र पर्यटन यांच्या सहकार्याने मिळालेले हे व्यासपीठ आदिवासी कलाकारांसाठी केवळ कला सादरीकरणाची संधी नसून रोजगार, सन्मान, बाजारपेठ आणि राष्ट्रीय ओळख मिळवून देणारे महत्त्वाचे पाऊल ठरत आहे.
पिंपळसोंड येथील आदिवासी सोंगी मुखवटा कलाकार शिवराम चौधरी यांच्या हस्तकलेने तर देशाच्या सीमा ओलांडल्या आहेत. त्यांचे सोंगी मुखवटे ब्रिटन, जर्मनी आणि इटलीपर्यंत पोहोचले असून गुजरात, ओडिशा, पश्चिम बंगाल, बडोदा म्युझियम, दिल्ली, गोवा येथील मोगा म्युझियम तसेच दिल्लीतील प्रजासत्ताक दिनाच्या राजपथावरील प्रदर्शनातही या कलेने आपली छाप उमटवली आहे. सापुतारा फेस्टिव्हलसह विविध राष्ट्रीय स्तरावरील व्यासपीठांवरही या कलेचे दर्शन घडले आहे.
कला, पर्यटन आणि आत्मनिर्भरतेची नवी वाट
आदिवासी हस्तकलेच्या माध्यमातून लोककलाकारांना पर्यटनाशी जोडण्याचे काम सुरू झाले असून, पारंपरिक कलांचे जतन आणि संवर्धन करताना स्थानिक कलाकारांसाठी रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होत आहेत. गावकुसातील कला देशाच्या आणि जगाच्या व्यासपीठावर पोहोचणे ही सुरगाणा तालुक्यासाठी अभिमानाची बाब ठरत आहे.
या पारंपरिक आदिवासी वारशाचे जतन, संवर्धन आणि देशभर प्रसारासाठी सामाजिक कार्यकर्ते देविदास कामडी, रतन चौधरी, लक्ष्मण बंगाळ, काशिनाथ बंगाळ, सुमनदास आदी प्रयत्नशील आहेत.
“सुरगाण्याच्या डोंगरदऱ्यांतून निघालेले ढोल-पावरीचे सूर आज कलकत्त्याच्या कलामंचावर घुमत आहेत; ही केवळ कलाकारांची कामगिरी नसून महाराष्ट्राच्या आदिवासी संस्कृतीचा राष्ट्रीय गौरव आहे.”