maharashtratribalnews

सोनजांब येथे जागतिक महिला दिन , महिला मेळावा व नवदुर्गा पुरस्कार सन्मान सोहळा उत्साहात

मुख्य संपादक l मनोज पाटील, दिंडोरी

सोनजांब (ता..दिंडोरी )ग्रामपंचायत च्या वतीने आयोजित जागतिक महिला दिन , महिला मेळावा व नवदुर्गा पुरस्कार सन्मान सोहळा मोठ्या उत्साहात  संपन्न झाला .या कार्यक्रमाच्या प्रमुख वक्त्या शिवव्याख्यात्या श्रीमती शोभा जाधव मॅडम यांनी महिलांना मार्गदर्शन करतांना ' राजमाता जिजाऊ आऊसाहेब  ज्यांना समजल्या त्यांना छत्रपती शिवाजी महाराज समजले . राजमाता जिजाऊ आवसाहेबांनी लाख मोलाचा पुत्र या देशाला दिला म्हणून खऱ्या अर्थाने आपला धर्म आणि आपले राष्ट्र आज सुरक्षित आहे म्हणून धर्म संरक्षणाचे खरे कार्य एका स्त्रीनेच जगवले, जागवले आणि वाढवले हे कदापिही विसरता येणार नाही. म्हणून सर्वप्रथम स्रीचा सन्मान आणि आदर करायला शिकले तरच समाज खऱ्या अर्थाने सुसंस्कृत होईल. प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एका खंबीर स्त्रीची साथ महत्त्वाची आहे हे इतिहासातून दिसून येते. आपल्या देशाला राजमाता जिजाऊ ,महाराणी येसूबाई, महाराणी ताराबाई, अहिल्यादेवी होळकर, प्रतिभाताई पाटील, इंदिरा गांधी ,सुनीता विल्यम्स, कल्पना चावला ,झाशीची राणी, किरण बेदी यांसारख्या कर्तबगार स्त्रियांचा वारसा लाभलेला असून तो आदर्श पुढे नेणे आजच्या प्रत्येक स्त्रीचे कर्तव्य आणि जबाबदारी आहे' असे आपल्या भाषणातून  म्हणाल्या. महान कर्तबगार स्त्रियांचा इतिहास महिलांसमोर मांडताना अन्यायाविरुद्ध आवाज उठवायला शिका तरच खऱ्या अर्थाने आजची स्त्री सुरक्षित होईल अन्यथा नाही हे सांगत असताना आजचे दुर्दैव म्हणजे  आज महिला, मुली किती मोठ्या प्रमाणात असुरक्षित आहे याचे उदाहरण देत त्यांनी खेद व्यक्त केला.यावेळी अनेक कर्तबगार महिलांचा इतिहास समोर ठेवत त्यांनी आजच्या मुली आणि स्त्रियांच्या समोरील समस्या व आव्हाने महिलांसमोर मांडली.सरपंच श्री प्रभाकर भाऊ जाधव यांच्या प्रेरणेने गावातील महिलांना व्यासपीठ उपलब्ध करून दिल्याबद्दल  श्रीमती जाधव यांनी  मा.सरपंच जाधव यांचे आभार मानले. यावेळी सोनजांब गावातील विविध क्षेत्रात महत्त्वपूर्ण कामगिरी पार पाडलेल्या मंदाकिनी संधान, अश्विनी जाधव, अर्चना जाधव, योगिता शिरसाट ,संगीता पाटील ,पूजा जाधव ,रूपाली जाधव, उषा सावंत ,संजना जाधव, प्रतिभा जाधव व उषा सूर्यवंशी यां नवदुर्गांचा साडीचोळी व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
 कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी  सौ. सुनिता ताई जाधव होत्या. कार्यक्रमाचे वैशिष्ट्य असे की प्लास्टिक मुक्ती साठी संदेशाच्या स्वरूपात महिलांना ज्यूटच्या पिशव्या वाटप करून प्लास्टिक मुक्ती चा एक आगळावेगळा संदेश महिला दिनाच्या निमित्ताने ग्रामपंचायत सोनजांबच्या वतीने देण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सोनजांब गावचे सरपंच श्री प्रभाकर भाऊ जाधव, श्री तुकाराम जाधव, ग्रामसेवक श्री सोमनाथ ढोकरे, तसेच शिल्पाताई जाधव ,कवयित्री वैशालीताई जाधव, सौ. रेखाताई जाधव यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रासवाग माध्यमिक विद्यालयाच्या शिक्षिका श्रीमती शारदा कराटे यांनी केले.यावेळी सोनजांब गावातील महिला मोठ्या संख्येने  उपस्थित होत्या.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने