maharashtratribalnews

पत्नीनेच केली पतीची कुर्‍हाडीने हत्या तब्बल दोन महिने शोषखड्ड्यात प्रेत ठेवले पुरुन

सुरगाणा । दि.14 प्रतिनिधी:- सुरगाणा तालुक्यातील खुंटविहिर जवळील मालगोंदा येथे पत्नीनेच पतीची कुर्‍हाडीने निर्दयी निघृण हत्या करुन तब्बल दोन महिने घरातील शौचालयाच्या शोषखड्ड्यात प्रेत पुरुन ठेवले होते. त्यानंतर पतीच्या नातेवाईकाने पत्नीकडे विचारणा केली असता तिच्याकडून उडवाउडवीचे उत्तरे देत असल्याने संशय व्यक्त करण्यात आला. त्यानंतर पतीच्या नातेवाईकांनी पोलिस गाठून पोलिसांनी चक्रे फिरवून हा प्रकार उघडीस आला आहे. 
      खुंटविहिर जवळील मालगोंदा येथील मयत इसम यशवंत मोहन ठाकरे (42)  रा. मालगोंदा हा 14 एप्रिल 2025 पासून घरातून मजूरी करीता गुजरात राज्यातील बिलीमोरा येथे गेला आहे असे आरोपी पत्नी प्रभा यशवंत ठाकरे (38)  हिने सासरे मोहन ठाकरे यांना सांगितले. तदनंतर ती स्वतः मजूरी करीता बिलीमोरा येथे निघून गेली. घरच्यांनी यशवंतची नातेवाईकांकडे  शोधा शोध सुरु केली. कामासाठी बाहेर गावी गेला असेल तर तो घरी परतणार या आशेने घरचे आई -वडील वाट पहात होते. पाऊस सुरु झाला तरी अद्याप तरी यशवंत का घरी येत नाही. शिवाय त्याची पत्नी प्रभा हि पतीचा का शोध घेत  नाही. सुमारे दोन महिन्यापासून बेपत्ता असलेला यशवंत कामावरून घरी न परतल्याने संशयाची सुई प्रभाकडे अधिकच बळावली. घरात तपास केला असता घरातील ओसरीवर खड्डा खोदून शेण मातीने सारवलेले दिसून आल्याने मयताचे वडील मोहन ठाकरे यांना संशय आल्याने पोलीस ठाण्यात सुने विषयी तक्रार दाखल केली. पोलिसांनी बिलीमोरा येथून प्रभा हिस तपासणी करीता सुरगाणा येथे पोलीस ठाण्यात आणण्यात आले. पोलिसांनी पंचनामा करीत महसूल विभागाला समवेत घेत घरातील ओसरीवरील खड्डा खोदकाम केले मात्र प्रेत आढळून आले नाही. प्रभाने पोलिसांनी तपासाता गुंगारा देत आरोप फेटाळून लावले. पोलिसांनी सोडल्याने बिनधास्तपणे ती फिरत होती. दोन दिवसांनी यशवंतचा लहान भाऊ उत्तमची पत्नी मेथू हि वीस ते पंचवीस दिवसापूर्वी दीर घरी  आले का ?असा तपास केला असता प्रभाने दारात असलेल्या यशवंतच्या चप्पला लपवत मांडीखाली ठेवत चपलावर बसून  गप्पा मारल्या हि बाब मेथीच्या नजरेतून सुटली नाही. खड्डा खोदला असता काहीही धागा दोरा हाती न लागल्याने पोलिसांना रिकाम्या हाताने परतावे लागले होते. मेथीने पती उत्तम यास हि सर्व हकिकत सांगत दक्षिणेस असलेले पडका शौचालयाचा शोषखड्डा आहे त्यामध्ये तर नाही ना असा अंदाज व्यक्त करीत जाऊन बघून या असे सांगितले असता उत्तमने संध्याकाळी जाऊन पाहिले असता त्या शोषखड्ड्यावर नीळ मासी पडत असून कुजलेल्या वस्तू सारखा वास येतोय असे लक्षात आले. खड्डातील माती ओकरुन पाहिली असता प्रेत असल्याचे आढळले. तातडीने पोलिसांना कळविण्यात येऊन चौकशी करीता मयताची पत्नी प्रभाला ताब्यात घेत चौकशी केली असता मीच कुर्‍हाडीच्या फाशाने डोक्याच्या मागील भागात टोला मारल्याने तो मयत झाला असल्याची कबुली दिली आहे. अखेर पंचनामा करीत तब्बल घरातच शोषखड्ड्यात पुरुन ठेवलेले कुजलेले प्रेत बाहेर काढले असता केवळ हाडांचा सांगाडा उरला होता. ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. शुभम परदेशी यांनी जागेवरच शवविच्छेदन केले. शरीराचे मान, धड, हातपाय असे तीन तुकडे करून गोणी मध्ये भरून शोषखड्ड्यात प्रेत टाकून माती, मुरुम, भाताची फोतरे, प्लास्टिक पिशव्या टाकून त्यावर वास येऊ नये म्हणून फॉरेट तसेच औषधे टाकून प्रेत घरातील शौचालयाच्या शोषखड्ड्यात पुरले होते. हे सर्व एकटी पत्नी करु शकते का? कोणी मदत केली असावी का? आरोपी प्रभा हिचे माहेर डांग सीमावर्ती भागातील शिलोटमाळ येथे एक ते दीड किलोमीटर अंतरावर आहे. याबाबतीत शंका व्यक्त केली जात आहे. हत्येचे नेमके कारण समजले नसून पुढील तपास पोलिस निरीक्षक राहुल मोरे,  नायब तहसिलदार मोहन कुलकर्णी, पोलीस उपनिरीक्षक अण्णा साहेब दिघे यांच्या मार्गदर्शनाखाली पंडित खिरकाडे, संदीप पगारे, रमेश चव्हाण, मनोज चव्हाण, गणेश आव्हाड, लहूदास गायकवाड, रमेश महाले तसेच फॉरेन्सिक लॅब नाशिके करीत आहेत.  मारेकरी पत्नीच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या असून गजाआड केले आहे. मयताच्या पश्चात पत्नी, मुलगा, आई, वडील, भाऊ असा परिवार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने