( गुजरात सिमेलगत बारागाव डांग भागात साजरी करण्यात येणारी होळी)
आदिवासी बांधवांची होळी.. पाप दु:ख जाळी..
कार्यकारी संपादक l देविदास कामडी
" होळी बाय तू भोळी व सदा शिमगा खेळीव..! होळी बायला मनाशूं पहिलं कापड चढावशूं..! याप्रमाणे नारळ, हारडे, करडे , वाट्या, खारका, पापड्या अशा वर्णनाची गाणी शिमगा सणाला आदिवासी भागात कानावर पडतात. आदिवासी भगिनींनी सुमधूर आवाजात गायलेली पारंपरिक गाणी कानाला सुमधूर वाटतात. आदिवासी बांधवांकरीता होळीचा सण महत्त्वाचा आहे. कोणत्याही रोजगार, नोकरी, कामधंदा निमित्ताने बाहेरगावी असतील तरी थोडा वेळ काढून सण साजरा करण्यासाठी आपल्या मुळ गावी परत येतात.
महाराष्ट्र, मध्यप्रदेश ,गुजरात,राजस्थान या राज्यातील आदिवासी जमाती कोकणा,कोकणी, कुकणा, डांग जिल्ह्यातील कुणबी आदिवासी, कोळी महादेव,वारली,कातकरी,पारधी, ठाकर,भिल्ल,भिल्लाल, पावरा, मावची, तडवी, गामित या सह्याद्री व सातपुडा पर्वत रांगेतील आदिवासी जमाती
दिवाळी व होळी हे दोन्ही सण उत्साहात साजरे केले जातात. होळी सणाच्या गीतांमध्ये निसर्गातील पशू, पक्षी, प्राणी, झाडे-झुडपे, जल, जंगल, जमीन तसेच भाऊ, बहीण आदी नात्यागोत्यांचे वर्णन केले जाते ते असे..होळी पेटते पेटते गाव पाटलाच्या मानाने.. होळी मांगते मांगते मूळ आदिवासींच्या नावाने..
गावाच्या पाटलांनी आता निघावं बाहेर.. तुला न्यायालं आलयं कहाळी वाजंत्रीचा आहेर.. सासूनं दिलायं मला, दळणं दळाया.. दळण, दळीते मी कांडण करीते.. ये बंधू ये बंधू मला होळीला न्यायालं.. होळीच्या सणालं मालं पूजन कराया.! अशी भावा- बहिणींची अतूट माया, जिव्हाळा अन् प्रेमाचे वर्णन करणारी गाणी गायली जातात. सातपुडा पर्वत रांगेत जसा भोंगर्या,भगोरिया बाजार भरतो. तसाच या भागात होळीला सुरगाणा, हतगड,बा-हे, उंबरठाण या गावात ‘भुर्रकुंड्या बाजार’ भरतो. या भुर्रकुंडया मध्ये आदिवासी पेहराव, आभूषणे घालून पुरुष पारंपरिक महिलांचा पेहराव परिधान करून मनोरंजन करतात. महिला दुरूनच हा खेळ बघतात.
या बाजारात नवे कपडे, पूजा साहित्य,नित्य वापरातील भांडी, अलंकार,बांगड्या,मिठाई, खारीक,खजूर,डाळ्या,हारडे, गुळ, शेंगदाणे,कडे,पादत्राणे,तरुण-तरुणींचा हौस-मौजेच्या चैनीच्या वस्तूंची दुकाने थाटली जातात.तरुण तरुणी मनगट व दंडावर प्रेमाची प्रतीके तसेच प्रियजनांचे नाव अथवा नावाचे आद्याक्षर काढून गोंदवले जाते. हल्ली टॅटू काढले जाते.
या यात्रेत मनोरंजनासाठी मौत का कुऑ, सर्कस, जादूचे प्रयोग, चक्री पाळणे, खेळ, तमाशा आदी कार्यक्रम सादर होतात.
आदिवासी बांधवांचा सर्वात मोठा समजला जाणारा होळी म्हणजे शिमगा सण होय. शिमगा सण मोठा.नाही आनंदाचा तोटा.
या पाच दिवसात खटखुबा, गावठी तमाशा,पेरणे नृत्य, पावरी नृत्य, सिंह नृत्य, ढोल, तुर, मांदोळ, देवी देवतांची सोंग, चक्री पाळणे, मनोरंजनाचे कार्यक्रम,जादुचे प्रयोग
आदी सांस्कृतिक कार्यक्रमाची रेलचेल असते. हळूहळू आदिवासी संस्कृतीवर पाश्चिमात्य संस्कृतीचा प्रभाव पडत असल्याने हि मूळ आदीम कला संस्कृती आता लोप पावत चालली आहे.
या सणाकरिता तालुक्यातील चाकरमाने, रोजगारासाठी स्थलांतरीत झालेले आदिवासी बांधव कुटुंबकबिल्यासह आपापल्या गावी येतात. सणाच्या दिवसात सर्वत्र उत्साहाचे वातावरण असते. हाताला काम नसल्याने पैसे नसतील तर घरातील थोडे धान्य विकून सण साजरा केला जातो. जीवनातील दृष्ट प्रवृत्तीचा समूळ नाश करण्यासाठी होळी साजरी केली जाते. आदिवासींच्या परंपरा, रितीरिवाज, सण उत्सव, सांस्कृतिक, परंपरा यामध्येच जीवनाचे मूल्य दडले आहे. आदिवासींच्या देवीदेवता, इष्टदेवता, कुलदेवता, पूर्वजांना नैवेद्य दाखवणे, प्रकृतीही जीवन अशी पूजा केली जाते.
या पर्वतीय डोंगर दरीत या आदीम जमाती गुण्यागोविंदाने नांदत आहेत. पूर्वीपासून हा समाज वाघदेव, नागदेव, कणसरी, हिरवा, रानवा, डोंगर माऊली, चंद्र, सूर्य, अग्निदेव, पाणदेव यांची पूजा करत आला आहे. अलीकडे मात्र या संस्कृतीवर इतरांचे आक्रमण होऊ पाहत आहे. होळी सण पाच ते सात दिवस साजरा केला जातो. पौर्णिमेच्या आदल्या दिवशी लहान होळी रचली जाते. तिला ‘कुक्कड होळी’ म्हटले जाते. लहान मुलांची होळी म्हणून याकडे बघितले जाते.
या होळीकरिता गावातील तरुण, तरुणी, मुले एकत्र येतात. झाडाच्या साली (फाफतर) वाळलेली लाकडे जमा करून शिरीष या झाडाचा सोटा आणून खांब गाडला जातो. खांबाभोवती लाकडे, साली व गवत रचतात. सात ते आठ वाजेच्या सुमारास ही कुक्कड होळी पेटवतात. या होळीला मोठी माणसे उपस्थित नसतात. खांबाला शेणाच्या गोवर्या बांधतात. शेरोड, इळिंग या औषधी वनस्पतींचा निळा (ओला) सोटा,
शेणाच्या गोवर्या बांधतात. शेरोड, इळिंग या औषधी वनस्पतींचा निळा (ओला) सोटा, सोट्या आणून होळीच्या आगीत तापवून दगडावर जोरात आपटल्याने बंदुकीच्या छर्यासारखा मोठा आवाज होतो. यावेळी मुले बोंबाबोंब करतात. शेजारच्या गावाला शिव्यांची लाखोली वाहतात. त्यास ‘गूढ’ टाकणे असे म्हणतात.
दुसर्या म्हणजे पौर्णिमेच्या दिवशी मोठी होळी साजरी केली जाते. सायंकाळी पाच वाजेनंतर ही होळी रचतात. प्रत्येक कुटुंबातील सदस्याने जंगलात जाऊन वाळलेले लाकूड (खापर) आणून होळीजवळ टाकायचे. होळी रचायला गावातील कोतवाल नगारा वाजवून दवंडी पिटवतो. नगारा व कहाळी वाजंत्री घेऊन जंगलातील शिरीष किंवा काटे सावरीचा खांब वाजतगाजत आणला जातो. पोलीसपाटलाला मूळ करून वाजतगाजत घरून होळीजवळ आणतात.
गावातील भगत (पुजारी) होळीच्या लगतच्या जागेवर कोंबड्याचा बळी देऊन तांदळाच्या पुंजक्या (पुंजळ्या) पाडून आंब्याच्या पानांचे तोरण बांधून, सागाची पाने असलेल्या फांदीची पूजाअर्चा करतात. या पूजेत भगत निसर्ग देवता, अग्निमातेला नवस बोलतो, आमच्या गावाला सुख-समृद्धी लाभू दे. अग्नी, जल, वायू, वादळ (झगार), धरणीकंप, रोगराई या नैसर्गिक संकटांपासून रक्षण कर. पापी, दृष्ट प्रवृतीचा नाश कर, पाऊस पाणी भरपूर पडू दे, धनधान्याची बरकत होऊ दे, गुरे-वासरांचा सांभाळ कर, अशी प्रार्थना होळीला केली जाते. पूजेनंतर होळी पेटवली जाते. होळी लावण्याचा मान पोलीसपाटलाचा असतो. होळी पेटवताना खांब पूर्वेला पडला तर शुभ मानले जाते.
खांबाला तांदळाच्या पिठाच्या भाकरी बांधतात. त्याला पापड्या म्हणतात. वाजंत्री, ढोल, नगारा, वाजवत गाणी गात होळीभोवती फेर धरून सर्वजण आनंदाने नाचतात. तालुक्यात यात्रेत तूर, मादोळ, ठाकर्या नाच, देवीचा मुखवटा नाचवून फाग मागितला जातो. त्यास ‘भुर्रकुंड्या बाजार’ असे म्हणतात.
आजच्या या विज्ञान-तंत्रज्ञान, डिजिटल युगात आदिवासी समाजातील
रुढी, परंपरा, चालीरिती काही प्रमाणात लोप पावत आहेत. आदिवासींच्या लोककला, मौखिक परंपरेने आलेले लोकसाहित्य, लोकसंस्कृती नष्ट होत आहेत. या समाजात अनेक गोष्टी चांगल्या आहेत. जसे मुलगी झाल्यास आनंदोत्सव साजरा केला जातो, स्त्रीभ्रूणहत्या केली जात नाही, थोरांचा मानसन्मान केला जातो तसेच चोरी,खून, स्रियांचा छळ या गोष्टी निशिद्ध मानल्या जातात.
कर्मकांडांचे थोतांड न करता निसर्गाचे जतन व संवर्धन करणे करीता गावातील भगत जेष्ठ पुजारी यांच्या हस्ते विधीवत पूजा केली जाते. असे एक ना अनेक संस्कार चांगले आहेत. एकविसाव्या शतकात स्वतःला उच्चशिक्षित, सुधारलेले समजणार्यांकडून हरताळ फासला जात आहे.
आदिवासी समाजाकडे संस्कृतीचा अनमोल ठेवा आहे. तो वारसा जपून ठेण्यासाठी समाजाने पुढे यावे. आदिवासी समाजाने शिक्षणाची कास धरून मुलींच्या शिक्षणाबरोबरच सामाजिक, आर्थिक व राजकीय प्रगतीचा आलेख उंचावणे गरजेच आहे, असे आवाहन आदिवासी सामाजिक क्षेत्रात काम करणार्या स्वयंसेवी संघटनांकडून करण्यात येत आहे.
होळी तशी काहीही असो, दरवर्षी उत्साहात साजरी होते. होळी माणसाला माणूस बनवते, म्हणून म्हटले जाते ‘आदिवासींची होळी, इडा पिडा जाळी!’
निसर्गाच्या सान्निध्यात आदिवासीत्व शिकवते तेही प्रेम, सहकार्य, सेवा, पाहूणचार असे सर्व देते, मायेच्या आशीर्वादासह वर्षभर पुरेल एवढी ऊर्जा व उत्साह देते. हाच होळीचा ठेवा आहे.
आदिवासी निसर्गाला देव मानणारा आहे. निसर्ग आहे म्हणून आपण जगतो. आदिवासी जीवन व्यवहाराची मूल्ये उद्घोषित केली जातात. होळी लावण्यासाठी सगळ्यांची वाट पाहणे हे सामूहिक निर्णय व समानतेचे मूल्य प्रतिबिंबीत करणारे वर्तन आहे. सोन्याचे बंधन याचा अर्थ माणसांचे नियम, मर्यादा, नीतिमत्तेशी येतो. असे नियम, मर्यादा ज्या चांगल्या समाज जीवनासाठी आवश्यक आहेत. असे नियम, मर्यादा माणसे कुठल्याही लिखित कायद्य
आवश्यक आहेत. असे नियम, मर्यादा माणसे कुठल्याही लिखित कायद्याविना पाळतात.
वाईट चालीरिती बंद कराव्या
होळी हा खरा आदिवासींचा सण किंवा उत्सव. आदिवासी गवत, गोवर्या, झाडाच्या फांद्यांची होळी पेटवतात. आपल्या समाजातील चांगल्या प्रथा, रुढी, परंपरा सुरू ठेवाव्या व वाईट चालीरिती बंद कराव्या. अशा या
या शेकडो
वर्षापासून निसर्गाच्या कुशीत वावरणाऱ्या आदिवासी बांधवांची होळी ही हि ख-या अर्थाने अग्निदेवतेची पुजा होय..
. होळी शिमगा संपल्यावर पुन्हा एकदा आपल्या कामात आदिवासी बांधव गर्क होतात. ते पुढील उत्सवाची प्रतिक्षा करीत.
" आदिवासी समाज हा निसर्ग पूजक आहे.जल,जंगल,जमीन या निसर्गाच्या सानिध्यात राहून निसर्ग देवतेकडे नवस करत विधीवत पूजा केली जाते.होळी शिमगा हा सण उत्साहाचा माहोल असतो.हा सण सामुहिक जीवनमूल्यांवर आधारित प्रेम, आत्मविश्वास, बंधूंभाव, परस्पर सहकार्य, समता हि मूल्ये होळीच्या निमित्ताने जपली जातात.तीच मूल्ये पुढील पिढीला जीवन जगण्याची उमेद मिळावी म्हणून सुपूर्द केली जातात.जंगलावर प्रेम, निसर्गाची पूजा करीत जूने वादविवाद, कट कारस्थाने,भांडण तंटे या होळीत जाळून भस्म केले जातात.झाले गेले विसरुन जावे पुढे पुढे चालावे हिच शिकवण,नवी उमेद जणू काही या सणाच्या माध्यमातून समाजाला मिळते.आदिवासी समाज रोजगार, नोकरी, कामधंदा निमित्ताने इतरत्र स्थानांतरित होत आहे.आपली परंपरा, खाद्य संस्कृती,पेहराव,बोलीभाषा, देवदेवता, रितीरिवाज विसरत चालला आहे.इतर सनातन, पाश्चिमात्य संस्कृतीचा अंगिकार करीत आहे.या कारणाने आपली आदीम पणाची ओळख नामशेष होण्याच्या मार्गावर आहे.हि धोक्याची घंटा आहे.या करीता उठ आदिवासी जागा
हो..संघर्षाचा धागा हो..असे म्हणण्याची वेळ आली आहे.माझी संस्कृती..माझा अभिमान..
रतन चौधरी-(942307079)
डांगी, कोकणी बोलीभाषा अभ्यासक. ( मुळ लेखात बदल करु नये. स्थानिक व कालपरत्वे वेगवेगळ्या प्रथा, रुढी, परंपरा, निसर्ग पूजाअर्चा, विधी, संस्कृती, बोलीभाषा असू शकते.)