निळवंडी । दि. 16 वार्ताहर*
होळी, धुळवड नंतर दोन दिवसावर आलेल्या रंगपंचमी सणाचा उत्साह सगळीकडे दिसायला लागला आहे. दिंडोरी बाजारपेठेत बालगोपाळांसह नागरिकांची रंग, पिचकारी खरेदी करण्यासाठी लगबग सुरु झाली आहे.
बाजारपेठेत विविध प्रकारचे नैसर्गिक रंग, स्प्रे, लहान मुलांसाठी विविध प्रकारच्या पिचकार्या दाखल झाल्या आहेत. मिनी थंडर व थंडर या प्रकारच्या स्प्रेला सर्वाधिक मागणी असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. पिचकार्यांना लहान मुलांची पसंती मिळत आहे. 40 पासून 300 रुपयांपर्यंत पिचकार्या उपलब्ध आहेत. वाढत्या महागाई, इंधन दरवाढ आदी पाहता लहान मुलांच्या रंगपंचमीच्या पिचकार्यांनीही उचल खाल्याने मुलांना आकर्षक पिचकार्या आवडल्या असतानाही पालकांना आपल्या खिशाला मोठा आर्थिक फटका बसत आहे. महागड्या पिचकार्या खरेदी न करता सध्या अथवा कमी किमतीच्या पिचकार्या खरेदी करून मुलांची समजूत काढावी लागत आहे. काही पालक बिचार्या आपल्या एकुलत्या एक, लहान मुलासाठी, हिरमोड झालेल्या मुलांच्या चेहर्याकडे बघत नाईलाजाने महागड्या दरातील पिचकार्यांची खरेदी करताना दिसून येत असल्याचे व्यवसायिकांनी सांगितले.