दिंडोरी : दिंडोरी तालुक्यातील खतवड येथे खंडेराव महाराज यात्रात्सवाचे हे पहिलेच वर्ष उत्साहाचे वातावरण आहे.
'येळकोट येळकोट जय मल्हार, खंडेराव महाराज की जय ’च्या जय घोषात खतवड येथील खंडेराव महाराज यात्रोत्सव जल्लोषात व चैतन्यमय वातावरणात गुरूवार दिं.१३ मार्च रोजी साजरा होणार असून पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
खतवड येथे वसंत ऋतूतील फाल्गुन महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला होळी सणाला खंडेराव महाराज याञोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. गुरुवारी सकाळी ८ वा. चांदोरी येथील गोदावरी नदीचे आणलेल्या जलाची पारंपरिक वाद्याच्या गजरात मिरवणूक व ग्रामदैवत ,देवी ,देवताचे विधिवत पुजन व जलाभिषेक करण्यात येईल.दुपारी तीन वाजता खंडेराव महाराज प्रतिमाची रथातून ढोलताशाच्या गजरात भव्य मिरवणूक काढण्यात येईल.सायंकाळी सहा वाजता बारा गाड्या ओढण्याचा कार्यक्रम होईल.
येथील भाविकांचे श्रद्धास्थान खंडेराव महाराज मंदिरात यात्रोत्सव साजरा करण्याचे पहिलेच वर्ष असल्याने,जल्लोषात, भक्तिमय व चैतन्यमय वातावरणात बारागाड्या ओढण्याचा कार्यक्रम मुख्य आकर्षण ठरणार आहे.
त्यानंतर राञी ९ वा. वाघ्या मुरूळीचा गायन, गोंधळ, जागर ,तळी भरणे, गावातील नवदामपत्यासह अन्य जोडप्याच्या हस्ते पुजा अर्चा करून लंगर तोडणे व दुस-या दिवशी शुक्रवारी सकाळी ८ वाजता हजेरी आदी विविध धार्मिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरे होणार असून, पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी याञोत्सवाचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.