maharashtratribalnews

जागतिक महिला दिनी सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वित


म्हेळुस्के(प्रतिनिधी):-जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने महिलांसह संपूर्ण गावाची सुरक्षा व्हावी या उदात्त हेतूने निगडोळ ता.दिंडोरी येथील ग्रामपंचायत कार्यालयाने सीसीटीव्ही प्रणाली कार्यान्वित केली असून दिंडोरी पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक रघुनाथ शेगर यांच्या हस्ते उद्घाटन शुभारंभ संपन्न झाला.यावेळी प्रमुख वक्ते म्हणून प्रा.राजेंद्र उगले सर उपस्थित होते.
    दिवसेंदिवस वाढत चाललेली गुन्हेगारी,दरोडे,खून,मारामारी ,महिलांवरील अन्याय,अत्याचार यांसारख्या रोज घडणाऱ्या घटनांनी सर्वसामान्य नागरिकांच्या काळजाचा थरकाप उडत असतांना महिलांसह अल्पवयीन मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.त्या अनुषंगाने ग्रामीण भागातील अपप्रवृत्तींना आळा घालण्यासाठी व महिलांच्या सुरक्षेसाठी निगडोळ ग्रामपंचायत कार्यालयाने अतिशय स्तुत्य उपक्रम राबवत अत्याधुनिक स्वरूपाच्या शंभर मिटर अंतरापर्यंत सुस्पष्टपणे नजर पोहोचेल असे कॅमेरे बसवून संपूर्ण गाव ग्रामपंचायत कार्यालयाच्या कार्यकक्षेत समाविष्ट झाल्याचे गौरवोद्गार काढत जागतिक महिला दिनानिमित्त महिला भगिनींसाठी अमूल्य भेट असल्याचे सांगतांना निगडोळ ग्रामपंचायतीचा आदर्श घेऊन इतरही गावांनी सुरक्षेच्या दृष्टीने पाऊल उचलण्याची अपेक्षा पोलिस निरीक्षक रघुनाथ शेगर यांनी व्यक्त केली.प्रा.उगले सरांनी देखील कवितेच्या माध्यमातून महिलांना सशक्त व शक्तिशाली होऊन येणाऱ्या कोणत्याही संकटावर मात करता यावी याकरिता महिलांच्या न्याय हक्कासाठी व शिक्षणासाठी झटणाऱ्या सावित्रीबाई फुलेंचा इतिहास उपस्थितांसमोर उलगडला.माजी उपसरपंच शरद मालसाने यांनी महिलांच्या व ग्रामस्थांच्या सुरक्षेसंदर्भात नेहमीच प्रश्न भेडसावत असल्याने चिंता वाटत होती.तालुक्यातील गावांच्या तुलनेत पोलिस बांधवांचे संख्याबळ अगदीच नगण्य असे आहे.प्रत्येक ठिकाणी त्यांना लक्ष देणे व सुरक्षा पुरविणे शक्य होईल याची शाश्वती नाही.परंतु,आपणही एक जबाबदार नागरिक म्हणून जर सकारात्मक विचार करून नवीन कल्पना अंमलात आणली तर नक्कीच यशस्वी होऊ शकतो,याच कल्पनेतून निगडोळ येथे अत्याधुनिक स्वरूपाचे पाच कॅमेरे कार्यान्वित करून एका विशिष्ट अँपच्या माध्यमातून सरपंच,ग्रामविकास अधिकारी व स्वतः पोलिस निरीक्षक यांचे चोविस तास लक्ष राहील अशी व्यवस्था केलेली आहे.जेणेकरून भविष्यात कुठलीही अनुचित घटना घडणार नाही.कार्यक्रमाचे प्रास्ताविक ग्रामसेविका श्रीमती वाय.के. थविल यांनी केले तर सूत्रसंचालन प्रा.साठे सर यांनी केले.याप्रसंगी सरपंच कृष्णा रहेरे,उपसरपंच वंदना मालसाने यांच्यासह सदस्य, ग्रामस्थ व महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने