महाराष्ट्र ट्रायबल न्युज

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा विराचापाडा येथे वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न.

लोकसहभागातुन अनोखा शैक्षणिक,सांस्कृतिक उपक्रम.
प्रतिनिधी l शंकर निंबारे 
        दि.१९ - त्र्यंबकेश्वर तालुक्यातील ग्रामपंचायत खडकओहोळ पैकी विराचापाडा हे छोटेसे गाव आहे. येथील अंदाजे २५० (दोनशे पन्नास) लोक संख्या असुन गावात ७५ (पंच्याहत्तर) कुटुंब सहपरिवार राहत असुन ‘एकमेका साह्य करू अवघे धरू सुपंथ’ या उक्तीप्रमाणे गुण्यागोविंदाने नांदत आहेत. या गावात जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला इयत्ता पहिली ते पाचवी असे पाच वर्ग असुन शाळेच्या पटावरील एकुण संख्या ४१ (एकेचाळीस) इतके विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. दोन वर्षांपूर्वी विद्यार्थी वेळेवर शाळेत हजर राहत नव्हते. मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांची गळती होती. मुलांच्या शैक्षणिक विकासाकडे पालकांचे दुर्लक्ष असल्याचे शिक्षकांच्या लक्षात आले. विद्यार्थ्यांची गळती थांबवावी तसेच मुलांच्या शैक्षणिक विकासाकडे पालकांचे लक्ष केंद्रित व्हावे यासाठी शाळेचे मुख्याध्यापकांनी शालेय शिक्षण व्यावस्थापन समिती व यारी दोस्ती गृप तसेच ग्रामस्थांपुढे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत दरवर्षी सालाबादप्रमाणे वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम साजरा करण्यात यावा असा प्रस्ताव सादर केला. या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश समजून घेऊन सालाबादप्रमाणे वार्षिक स्नेहसंमेलन निमित्त नृत्य गायन कार्यक्रम घेण्याचे सर्वानुमते नियोजन करण्यात आले. या शैक्षणिक उपक्रमामुळे विद्यार्थ्यांचा उत्साह वाढला आणि पटावरील विद्यार्थ्यांची गळती शंभर टक्के थांबली तसेच मुलांच्या शैक्षणिक विकासाकडे आणि जिल्हा परिषद प्राथमिक शाळेकडे पालकांचे लक्ष केंद्रित झाले आहे. तसेच विविध शैक्षणिक उपक्रमात पालकांचा आणि विद्यार्थ्यांचा सहभाग वाढला आहे. यामुळे विद्यार्थ्यांचे विविध कलागुणांचे पैलू विकसित होताना दिसुन आले आहेत. असे शाळेचे मुख्याध्यापक कालिदास किरकिरे यांनी मनोगत व्यक्त केले.
    जिल्हा परिषद प्राथमिक शाळा विराचापाडा येथील विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी गावात लोकवर्गणी जमा करून ग्रामस्थांच्या सहकार्याने शालेय शिक्षण व्यावस्थापन समिती आणि यारी दोस्ती गृपच्या पुढाकाराने वार्षिक स्नेहसंमेलन (वर्षे दुसरे) निमित्त नृत्य गायन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मंचावर शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष रामदास खुताडे, यारी दोस्ती गृपचे अध्यक्ष विजय वड, उपसरपंच विलास थाळकर, ग्रामपंचायत सदस्य पंढरीनाथ खुताडे, शकुंतला खुताडे, ग्रा.पं.शिपाई सुनिल खुताडे, देवडोंगरा सोसायटीचे चेअरमन कृष्णा खुताडे, अनिल खुताडे, जेष्ठ नागरिक चंदर मिरका, शाळेचे मुख्याध्यापक कालिदास किरकिरे तसेच सहकारी शिक्षकवृंद प्रभाकर सहारे, शिरीष घुलुम आदी मान्यवर उपस्थित होते.
    नृत्य गायन कार्यक्रमात प्रथम सरस्वती मातेच्या व बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पुजन करण्यात आले. नंतर विद्यार्थ्यांनी वैयक्तिक आणि सांघिक असे नृत्य गायन सादर करुन ग्रामस्थांचे (प्रेक्षकांचे) मनोरंजन केले. एकुण ५० (पन्नास) वैयक्तिक व सांघिक नृत्य गायन सादर केली. ग्रामस्थांनी प्रत्येक नृत्य, गायनाला प्रोत्साहन देण्यासाठी दहा, वीस, पन्नास, शंभर असी रक्कम बक्षीस व्यातीरीक्त देऊन कलाकारांचा गौरव केला. कार्यक्रमाची प्रास्ताविका जांबुपाडा शाळेचे शिक्षक शिरीष घुलुम यांनी सादर केली तर शाळेचे शिक्षक प्रभाकर सहारे यांनी आभार मानले. यावेळी देविदास धनगरे, किसन खुताडे, आलका खुताडे, आरती थाळकर, पुंडलिक झोले, विजय वागळे, प्रविण मिरका, सुनिल खुताडे, गौरव थाळकर, भास्कर खुताडे, सुनिल निंबारे, चिंतामण खुताडे, सुनिल चावरे तसेच मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने