मोहाडी : वार्ताहर
अष्टबाहू गोपालकृष्ण देवस्थान ट्रस्ट आणि श्रीकृष्ण वारकरी भजनी मंडळातर्फे रविवारी (ता. 16) जगद्गुरू संत श्री तुकाराम महाराज यांचा त्रिशतकोत्तर अमृतमहोत्सवी बीज सोहळ्यानिमित्त धार्मिक कार्यक्रम झाले. पहाटे काकडा भजन, आरती नंतर सकाळी संत तुकाराम महाराज महाराजांच्या प्रतिमेचे पूजन देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त पंढरीनाथ कळमकर यांनी तर संपतराव देशमुख यांनी कलशपूजन केले. संत तुकाराम महाराज गाथा यांच्या अभंगावरील भजन झाले. दुपारी साडेबाराला "आम्ही जातो तुम्ही कृपा असो द्यावी,! सकाळा सांगावा विनंती माझी!! हा सदेह वैकुंठगमनाचा अभंग म्हणून पुष्पाची उधळण करत तुकाराम महाराजांचा जयघोष करण्यात आला. सुरेश जाधव यांच्या हस्ते महाआरती झाली. मृदंगाची साथसंगत विश्वम जाधव याने दिली. भाऊराव जाधव, प्रवीण जाधव, मुकुंद जाधव, रामभाऊ ढेपले, हरिभाऊ जाधव, भीमराव जाधव, विष्णु खुर्दळ,जगन जाधव, सागर ढेपले,भास्कर जाधव, नंदकुमार डिंगोरे, योगेश जाधव, महिला व ग्रामस्थ उपस्थित होते.
मोहाडी : श्रीकृष्ण मंदिरात रविवारी तुकाराम बीजेनिमित्त भजन म्हणताना भजनी मंडळ.