महाराष्ट्र ट्रायबल न्युज

ग्रामविकास मंत्र्यांकडे शिक्षकांच्या मागण्या मांडणार -आमदार सत्यजित तांबे


नाशिक - दि १४
महाराष्ट्राचे ग्रामविकास मंत्री ना. जयकुमार गोरे यांचेकडे सोमवारी दि १७ मार्च रोजी होणाऱ्या बैठकीदरम्यान शिक्षक बदली प्रक्रिया व प्रलंबित प्रश्नांसंदर्भात शिक्षकांच्या मागण्या मांडणार असल्याचे प्रतिपादन नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे यांनी नाशिक येथे शिक्षक संघाच्या पदाधिकाऱ्यांसमवेत चर्चा करताना केले .

सोमवारी मंत्रालयात मा. ग्रामविकास मंत्री यांचे अध्यक्षतेखाली शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांसंदर्भात बैठक आयोजित करण्यात आलेली असून आमदार सत्यजित तांबे यांना या बैठकीसाठी निमंत्रित करण्यात आलेले आहे .
यावेळी झालेल्या चर्चेत शिक्षक संघाचे जिल्हा सरचिटणीस प्रदीप पेखळे , एनपीएस शिक्षक संघ जिल्हाध्यक्ष सचिन वडजे, राष्ट्रीय सल्लागार धनंजय आहेर , विभागीय कार्यकारी अध्यक्ष प्रमोद शिरसाठ , सेवानिवृत्त शिक्षक संघ अध्यक्ष धनराज वाणी , संजय पेखळे सर , प्रशांत भोसले आदींनी सहभाग घेतला .

यावेळी पुढील विषयावर चर्चा झाली . बदली प्रक्रिया राबवताना सेवाजेष्ठ शिक्षकांची वयाची ५३ वर्ष ३१ मे ऐवजी ३० जून दिनांक पर्यंत गृहीत धरून त्यांना संवर्ग १ ची संधी देण्यात यावी . सन २०१८ व २०२२ बदली प्रक्रिया राबवताना ज्या शाळा अवघड घोषित केलेल्या होत्या त्या २०२५ मध्ये जर सोप्या क्षेत्रात आल्या असतील तर पूर्वीच्या अवघड शाळेचे सर्व लाभ त्या शाळेवर कार्यरत असलेल्या किंवा कामकाज केलेल्या शिक्षकांना या बदली प्रक्रियेत मिळावेत . १ मार्च २०१४ रोजी नियमित झालेल्या वस्तीशाळा शिक्षकांची सेवा जेष्ठता कमी भरत असल्याने बदली प्रक्रियेसाठी त्यांची पूर्वीची सेवा देखील गृहीत धरून त्यांना सेवाजेष्ठतेचा लाभ मिळावा . आंतरजिल्हा व जिल्हाअंतर्गत बदल्याअगोदर विस्तार अधिकारी केंद्रप्रमुख मुख्याध्यापक व पदवीधर पदोन्नती प्रक्रिया राबवावी व रिक्त झालेली पदे बदली प्रक्रिये दरम्यान दाखविण्यात यावी . संवर्ग चार एकल शिक्षकांवर बदली प्रक्रिये दरम्यान अन्याय होत असल्याने आपसी बदलीची सुविधा सुरू करावी.अवघड शाळा ठरवितांना शासन निर्णय निकषाप्रमाणे कार्यवाही व्हावी व ज्या शाळा दुर्गम अवघड क्षेत्रात आहे त्यांना अवघड क्षेत्राच्याच यादीत दाखविण्यात यावे . पेसा भागातील कार्यरत शिक्षकांना २९ फेब्रुवारी २०२४ शासन निर्णयाप्रमाणे एकस्तर वेतनश्रेणीचा लाभ देण्यात यावा .जिल्हा परिषद स्तरावर शिक्षकांची सर्व प्रलंबित देयके ३१ मार्च अखेर अदा व्हावी यासाठी मा. मुख्य कार्यकारी अधिकारी नाशिक , जिल्हा शिक्षणाधिकारी प्राथमिक नाशिक तसेच शिक्षण संचालक कार्यालय पुणे या स्तरावर पाठपुरावा करावा . पंचायत समिती स्तरावर शिक्षकांचे सेवा पुस्तक पडताळणीचे कॅम्प आयोजित करून शिक्षकांचे प्रलंबित कामे मार्गी लावावीत .

या व इतर विषयावर आमदार सत्यजित तांबे यांच्या समवेत चर्चा करण्यात आली

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने