निळवंडी l प्रतिनिधी :- दिंडोरी तालुक्यातील निळवंडी येथे गुढीपाडवा साजरा करत हनुमान यात्रोत्सव विविध सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रमांनी उत्साहात पार पडला. यात्रेच्या निमित्ताने भव्य कुस्त्यांची दंगल आयोजित करण्यात आली होती.
यात्रेच्या पहिल्या दिवशी मांडव व काठीची मिरवणूक काढून हनुमानाची विधिवत पूजा व अभिषेक करण्यात आला. वर्षभर हनुमान मंदिरात विविध धार्मिक उपक्रम राबवले जातात. यात्रेनिमित्त मंदिराभोवती विद्युत रोषणाई व पताका लावून परिसर सजवण्यात आला होता.
यात्रा मैदानात खाद्यपदार्थ, मिठाई, खेळणी आणि पाळण्यांची दुकाने थाटण्यात आली होती. रात्री कलावंतांचा तमाशा, देवीचे गाणे जागरण, वाघ्या-मुरळींचे गायन आणि विविध देवतांची मिरवणूक असे सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले.
दुसऱ्या दिवशी "हजेरी लावणे" हा पारंपरिक कार्यक्रम पार पडला. त्यानंतर भव्य कुस्त्यांची दंगल झाली. पंचक्रोशीतील अनेक नामवंत आणि उदयोन्मुख पहिलवानांनी सहभाग घेतला. लहान व युवा गटांतील कुस्त्या विशेष आकर्षण ठरल्या.
अंतिम मानाची कुस्ती कोर्हाटे येथील नवनाथ मालसाने यांनी जिंकली. त्यांना ३१०० रुपयांचे पारितोषिक देण्यात आले. या कुस्त्यांमध्ये पंच म्हणून उपसरपंच भाऊसाहेब पाटील, अंबादास दगू पाटील, सुनील पाटील, उत्तम पाटील, गोटीराम रंगनाथ पाटील, सुरेश पताडे, सुधाकर गवारे यांनी काम पाहिले.