निळवंडी । प्रतिनिधी :- सध्या खरीप पेरणीचे वेध लागले असून वरुणराजाची हजेरी लागण्यापूर्वी लोणचे बनविण्यासाठी ग्रामीण भागातील गृहिणींची लगबग सुरु झाली आहे. परंतू दिवसेंदिवस गावरान आमवृक्षाची कत्तल होऊन कलमीकरणाकडे सर्वांचाच ओढा वाढल्याने बाजारात गावरान कैर्याची आवक जेमतेम दिसून येत आहे. त्याचे भाव वधारल्याने लोणच्यासाठी लागणार्या गावरान कैर्या आंबट झाल्याचे चित्र सर्वच आठवठा बाजारात पहावयास मिळत आहे. ग्रामीण व शहरी भागात पावसाळा व हिवाळा ऋतुत दररोजच्या भोजनासोबत आंब्याच्या लोणच्याचा वापर केला जातो. भोजनाचा स्वाद वाढविण्यासाठी विशेष लोणच्यावर भर दिला जातो. शेतावर जाणारे मजूर, कामगार, कष्टकरी भाकरी ठेच्यासोबत लोणच्याच विशेष पसंती देत असतात. सध्या गृहिणी पेरणी कामास वेग येण्यापुर्वी सर्वत्र लोणचे बनविण्यासाठी घाई करतांना दिसत आहे. कैर्यांसोबतच लोणचे साठविण्यासाठी चिनी मातीच्या बरण्या खरेदी करत असून कैर्या खरेदीपासून तर लोणचे तयार होईपर्यंत यंदा मोठा खर्च येत असल्याने गृहिणींचे आर्थिक बेजट कोलमडले आहे. त्याचप्रमाणे यंदा बाजारात लोणचे घालवण्यासाठी लागणारे मसालेही महागले. कैर्या फोडणीचेही दर वाढून लोणच्याची चव महागली. परंतू भोजनाचा आस्वाद लोणच्याअभावी हरवल्यागत होत असल्याचे चित्र दिसत आहे.
लोणचे बनविण्यासाठी गृहिणींची लगबग
कृष्णा पवारमहाराष्ट्र ट्रायबल न्यूज
-
0