महाराष्ट्र ट्रायबल न्युज

रस्ते, साईटपट्ट्यांची दुरुस्ती करा : संतोष रहेरे

दिंडोरी । मनोज पाटील 
गेल्या पंधरा दिवसांपासून अवकाळी पाऊस पडत आहे. या पावसामुळे अनेक रस्त्यांची ‘वाट’ लागली आहे. रस्त्यांची व साईटपट्ट्यांची अतिशय दयनिय अवस्था झाली असून त्वरीत रस्त्यांची व साईटपट्ट्यांची दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी अंबानेरचे माजी सरपंच संतोष रहेरे यांनी केली आहे.
अहिवंतवाडी- पिंप्री अंचला, अंबानेर - अहिवंतवाडी, पांडाणे - कोशिंबे, तळेगाव वणी - सोनजांब, सोनजांब- बोपेगाव, जऊळके वणी - मातेरेवाडी, जोपूळ - लोखंडेवाडी- पालखेड बंधारा, करंजखेड - भनवड आदी रस्त्यांचे काम झाले आहे. पण या अवकाळी पावसामुळे रस्ता पुर्णपणे उखडून गेला आहे. त्याचप्रमाणे झालेल्या रस्त्यावरील साईटपट्ट्या भरले गेले नसल्याने छोट्या -मोठ्या अपघातांना सामोरे जावे लागत आहे. या रस्त्यावर वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. या रस्त्यावरील साईट पट्टे भरले गेले नसल्याने दुहेरी वाहन पास करतांना जिकीरीचे ठरत आहे. रस्त्याच्या कडेला खड्डे पडले आहे. त्यामुळे वाहन चालवतांना चालकांना मोठी कसरत करावी लागते. एकाचवेळी दोन मोठी आली तर मुख्य रस्त्यावरुन खाली उतरण्याशिवाय दुसरा पर्याय वाहन चालकांपुढे नसतो. अशावेळी अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशातच रस्ता अरुंद असल्याने दोन्ही बाजूने वाहन आल्यावर मुख्य रस्त्यावरुन खाली वाहन घेत नसल्यामुळे दोन्ही वाहनचालकांमध्ये बाचाबाची होतांना दिसत आहे. अनेक रस्त्यांचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याचे या अवकाळी पावसाने आताच दाखवून दिले आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून अवकाळी पाऊस पडत असल्याने अनेक रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्याने रस्ता खड्ड्यात की खड्ड्यात रस्ता असा प्रश्‍न सर्व सामान्य जनतेला पडला आहे. मागील काळात झालेले रस्त्यांचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे झाले असून दोन - तीन महिन्यातच रस्ता उखडून गेला आहे. तरी संबंधित विभागाने याकडे लक्ष देवून त्वरीत रस्त्यांची दुरुस्ती व साईट पट्ट्या भरण्यात यावे, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा अंबानेरचे माजी सरपंच संतोष रहेरे यांनी दिला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने