दिंडोरी । मनोज पाटील:- दिंडोरी येथील जाधव वस्तीवर चार वर्षीय बालकाचा बिबट्याने बळी घेतल्याच्या घटनेनंतर ग्रामस्थ भयभीत झाले आहे. दिड महिन्यात दोन घटना घडल्याने ग्रामस्थांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. अन्न व नागरी पुरवठामंत्री नरहरी झिरवाळ यांचे चिरंजीव युवा नेते गोकूळ झिरवाळ, खासदार भास्कर भगरे यांनी पीडीत जाधव कुटूंबियांची भेट दिली व पीडित जाधव कुटुंबीयांचे सांत्वन केले आहे. अधिकार्यांना बिबट्या शोधासाठी सर्च ऑपरेशन राबविण्याच्या सूचना दिल्या आहे.
दिंडोरी तालुक्यात दिवसेंदिवस बिबट्याची दहशत वाढल्याने शेतकरी भयभित झाले आहे. गेल्या दिड महिन्यापुर्वी तालुक्यातील वनारवाडी येथील 21 वर्षीय तरुणीवर बिबट्याने हल्ला केला होता. या हल्ल्यात तरुणीचा मृत्यू झाला होता. तसेच दिंडोरी येथील जाधव वस्तीत पाच दिवसांपुर्वी आजोबाच्या हातातून चार वर्षीयं बालकावर हल्ला करुन ओढून शेतात नेले. या हल्ल्यात बालकाचा मृत्यू झाल्याने दिंडोरी परिसरात ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट पसरली होती. या घटनेमुळे दिंडोरी शहर व परिसरातील नागरिकांनी नाशिक - कळवण रस्त्यावरील दिंडोरी ग्रामीण रुग्णालयासमोर व वनविभागाच्या कार्यालयासमोर रात्री 11 वाजता रास्ता रोको आंदोलन केले होते. या आंदोलनामुळे वनविभागाने ग्रामस्थांचे समजूत काढून लवकरात लवकर बिबटे पकडण्यात येतील, अशी लेखी आश्वासन दिल्यानंतर रास्ता रोको मागे घेण्यात आले. दुसर्या दिवशीच जाधव वस्तीवर वनविभागाकडून लावण्यात आलेल्या पिजर्यात मादी जातीचा बिबट्या पिजर्यात अडकला. परंतू त्याच दिवशी या परिसरात काही महिलांना दोन बिबट्यानी दर्शन दिल्याने परिसरातील ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून बिबट्याची दहशत या परिसरात अजूनही आहे. या पार्श्वभूमिवर अन्न व औषध प्रशासनमंत्री ना. नरहरी झिरवाळ यांचे चिरंजीव गोकूळ झिरवाळ व दिंडोरी लोकसभेचे खासदार भास्कर भगरे यांनी जाधव यांचे वस्तीवर जाऊन कुटुंबीय, नातेवाइकांची भेट घेत सांत्वन केले. यावेळी मयत रुद्र आई, वडील, आजोबा, आजीआदी नातेवाइकांचे आक्रोश करत बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी केली. झिरवाळ व खा. भगरे यांनी वनविभागाच्या अधिकार्यांना दुरध्वनीव्दारे बिबट्या शोधमोहीम राबविण्यास सांगितले. वनविभागाच्या अधिकार्यांना ज्या परिसरात बिबट्याचा वावर जास्त प्रमाणात आहे त्या ठिकाणी तातडीने सीसीटीव्ही कॅमेरे, पिजर्यात भक्ष्य ठेवून पिंजरे लावण्यात यावे. तसेच त्या परिसरातील ग्रामस्थांना वनविभागाच्या कर्मचार्यांनी बिबट्याविषयी माहिती देवून जनजागृती करण्यात यावे, असे यावेळी सांगितले. याप्रसंगी परिसरातील शेतकरी, ग्रामस्थ उपस्थित होते.