देवडोंगरी l शंकर निंबारे :-त्र्यंबकेश्वर व पेठ तालुक्यातील उडान चॅरिटेबल ट्रस्ट व रजनी फार्मिंग या ट्रस्टच्या माध्यमातून त्र्यंबकेश्वर, पेठ तालुक्यातील ३०० शेतकऱ्यांनी पारंपारिक शेतीला पूरक पीक म्हणुन ३५० एकरांवर शेवगा लागवड केली आहे.
हरसूल (दि.१) येथील ग्रामपंचायतीच्या हॉलमध्ये त्र्यंबकेश्वर आणि पेठ तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी शेवगा लागवड कार्यशाळेचे आयोजन करण्यात आली होती. कार्यशाळेत शेवग्याच्या रोपांचे संगोपन, छाटणी नियोजन, खत कीडनाशके फवारणी तसेच तण व्यवस्थापन या विषयांवर उडान ट्रस्टचे अध्यक्ष अरुण पटेल, रजनी पटेल यांनी शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन केले. कार्यक्रम प्रसंगी पारंपरिक शेती पूरक शेवगा लागवडीमुळे येणाऱ्या उत्पादनातून शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळणार असे उडान चॅरिटेबल ट्रस्ट चे कोऑर्डिनेटर टीम मॅनेजमेंट अशोक भोये यांनी मार्गदर्शन करताना सांगितले. तसेच यावेळी आनंद शिंगाडे, भाऊराव माळेगाव, सुरेखा मुर्तडक यांनी शेतकऱ्यांना सखोल शेवगा लागवडीविषयी मार्गदर्शन केले. त्र्यंबकेश्वर व पेठ तालुक्यातून दीडशे हुन अधिक शेतकरी यावेळी उपस्थित होते.