बा-हे l नामदेव पाडवी:- शासनाने चालू शैक्षणिक वर्षाची सुरुवात १६ जून पासून केली असून आजपासून राज्यातील पहिली ते दहावीच्या सर्व शाळा उघडल्या आहेत.
गुणवत्तेचा ध्यास, प्रगतीचा ध्यास. मोफत शिक्षणातून करूया सर्वांगीण विकास. आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि सर्वांगीण विकासासाठी अशा घोषणा देत सुरगाणा तालुक्यातील ठाणगाव येथील जिल्हा परिषद आदर्श शाळेत आज पहिल्या दिवशी नवीन दाखल झालेल्या विद्यार्थ्यांना ट्रॅक्टर मध्ये बसवून गावातून मिरवणूक काढून जंगी स्वागत करण्यात आले.तसेच अंगणवाडी सेविका संगिता महाले यांनी नवीन प्रवेशित विद्यार्थिनींचे पहिले पाऊल कागदावर उमटवत त्यांचे औक्षण करण्यात येऊन गुलाब पुष्प,चॉकलेट देऊन स्वागत करण्यात आले.शासनाच्या वतीने पुरविण्यात आलेल्या मोफत गणवेश व पाठ्यपुस्तकांचे विद्यार्थ्यांना उपस्थित ग्रामविकास अधिकारी चंद्रकांत गावीत पालक व शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीने गोरख महाले,अशोक पालवी यांच्या हस्ते वाटप करण्यात येऊन शालेय पोषण आहारात बुंदीचे वाटप करून शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना मेजवानी देखील देण्यात आली.तसेच निपुण झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी मुख्याध्यापक पांडुरंग वाघमारे,शिक्षक पुना चौधरी,वामन जाधव, सुरेश चौधरी,बाबुराव वाघमारे, जयंतीलाल भोये, बाबुराव गुंबाडे, मनोहर चौधरी यांच्यासह पालक,विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.