maharashtratribalnews

महाराष्ट्र कृषी दिनानिमित्त उमराळे खुर्द येथे मधमाशीपालन व कृषीदिनविषयी जनजागृती कार्यक्रम

दिंडोरी l प्रतिनिधी:- १ जुलै २०२५ रोजी महाराष्ट्र कृषी दिनानिमित्त उमराळे खुर्द  ता.दिंडोरी येथे विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात झेडपी शाळा उमराळे खुर्द व एमव्हीपीच्या के.डी.एस.पी. कृषी महाविद्यालय, चाचडगाव विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
    या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना व ग्रामस्थांना कृषीदिनाविषयी जनजागृती आणि मधमाशीपालन (Apiculture) या विषयावर माहिती देण्यात आली. मधमाश्यांचे पर्यावरणातील महत्त्व, परागीकरणातील भूमिका आणि शेतीपूरक व्यवसाय म्हणून याचे आर्थिक फायदे यावर मार्गदर्शन करण्यात आले.
    कार्यक्रमात झेडपी शाळेचे शिक्षक व विद्यार्थी, तसेच एमव्हीपी कृषी महाविद्यालयाचे विद्यार्थी ओंकार मोगल, जय मुरडनार, शुभम जाधव,सौरभ हरक,दर्शन माळोदे,जितेंद्र गायकवाड इत्यादींनी सक्रीय सहभाग घेतला. या विद्यार्थ्यांनी शाळेच्या विद्यार्थ्यांसमवेत गावामध्ये रॅली काढून कृषी दिनाबाबत जनजागृती केली.
    याच कार्यक्रमाचा एक भाग म्हणून झेडपी शाळेच्या परिसरात वृक्षारोपणाचा उपक्रम राबविण्यात आला. विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी मिळून विविध प्रकारची फळझाडे व फुलझाडे लावली. पर्यावरण रक्षणाचे व समाजप्रबोधनाचे भान ठेवून हा उपक्रम पार पडला.
     या प्रसंगी गावकऱ्यांनीही उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. ग्रामस्थांनी विद्यार्थ्यांच्या उपक्रमाचे कौतुक करत, असे उपक्रम वारंवार घडावेत असे मत व्यक्त केले .या कार्यक्रमासाठी झेड पी शाळेचे प्राध्यापक संजीव नामदेव जेजुरे यांचे सहकार्य लाभले.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने