बोरगाव l प्रतिनिधी :- १६ जुलै २०२५ रोजी तालुका कृषी अधिकारी कार्यालय, सुरगाणा येथे तालुक्यातील सर्व बियाणे, रासायनिक खते व कीटकनाशके विक्रेत्यांची महत्वपूर्ण मार्गदर्शन सभा पार पडली. या सभेच्या अध्यक्षस्थानी तालुका कृषी अधिकारी ज्ञानदेव तिखे होते.
या वेळी कृषी अधिकारी (गुणवत्ता नियंत्रण) संजय पवार यांनी उपस्थित विक्रेत्यांना महत्त्वाच्या नियमांची माहिती देत पुढील बाबींचे पालन करण्याचे आवाहन केले.
विक्री परवाने, दरफलक व भावफारक माहिती केंद्राच्या दर्शनी भागात स्पष्टपणे लावावी.विक्री व साठा नोंदवही अद्ययावत ठेवावी. विक्री परवाने विहित मुदतीत नूतनीकरण करावेत.विक्री पावतीत संपूर्ण तपशील नमूद करून शेतकऱ्याची स्वाक्षरी घ्यावी, व पावतीवर खाडाखोड टाळावी.बियाण्यांची खुली विक्री किंवा पिशवी फाडून विक्री करणे टाळावे.अनधिकृत ठिकाणी साठवणूक व विक्री केल्यास कारवाई होईल.सर्व निविष्ठा अधिकृत विक्री केंद्रावरच उपलब्ध ठेवाव्यात. निविष्ठांची विक्री कोणत्याही परिस्थितीत जादा दराने करू नये किंवा इतर उत्पादने खरेदीस लादू नयेत.
तालुका कृषी अधिकारी ज्ञानदेव तिखे यांनी सर्व विक्रेत्यांना सूचित केले की, भविष्यात कोणत्याही शेतकऱ्याची तक्रार येणार नाही याची काळजी घ्यावी.
या सभेला मंडळ कृषी अधिकारी हंसराज भदाणे, अमित भोर, सुमित मोरे यांच्यासह तालुक्यातील अनेक निविष्ठा विक्रेते उपस्थित होते.