दिंडोरी । प्रतिनिधी:- दिंडोरी - वणी रस्त्यावर बलाजी नर्सरीजवळ मध्यरात्री झालेल्या अपघातात सात जणांचा मृत्यू झाला असून या घटनेने कोशिंबे, देवठाण व सारसाळे परिसरावर शोकाकळा पसरली आहे. मृतांमध्ये तीन महिला, तीन पुरुष व अडीच वर्षीय बालकाचा समावेश आहे.
कोशिंबे,देवठाण व सारसाळे येथील गांगुर्डे, जाधव, वाघमारे हे तीन कुंटूबिय आपल्या नातेवाईकाच्या मुलाच्या वाढदिवसाच्या कार्यक्रम करिता नाशिक येथे अल्टो वाहन क्रमांक (एमएच 04 वू 6642) याने नाशिक येथे गेले होते. वाढदिवस कार्यक्रम ्रझाल्यानंतर ते आपल्या घरी परतत असतांना दिंडोरी - वणी रस्त्यावरील बालाजी नर्सरी व बाजार समितीच्या आवारासमोरच समोरुन येणारी मोटारसायकल व अल्टो वाहन (एमएच 04 वू 6642) यांच्या जोरदार धडक झाली. या भीषण अपघातानंतर अल्टो गाडी रस्त्याच्या बाजुला असलेल्या पाण्याच्या नालीमध्ये पलटी झाली. अल्टो वाहनातील महिला व पुरुषांना बाहेर निघता न आल्याने त्यांच्या नाका तोंडात पाणी गेल्याने बुडून जागीच मृत्यू झाला आहे. मोटारसायकलवरील मंगेश यशवंत कुरघडे, (25), अजय जगन्नाथ गोंद (18) रा.नडगे गोट, ता. जव्हार,जि. पालघर सध्या रा. भोला पिंपळगाव,सातपूर हे जखमी झाले असून त्यांना पुढील उपचारासाठी नाशिक जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे. यावेळी नाशिकचे पोलिस उपअधिक्षक आदित्य निलखेलकर, जिल्हा वाहतूक शाखेच्या पोलिस उपअधिक्षक मीरा अदमाने, प्रादेशिक परिवहनचे प्रदीप शिंदे यांनी घटनास्थळी पाहणी केली. पुढील अधिक तपास पोलीस निरीक्षक रघुनाथ शेगर याच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करीत आहे. घटनास्थळी माजी नगराध्यक्ष कैलास मवाळ यांनी जाऊन कुटुंबियांचे सांत्वन केले.
*वाढदिवस ठरला अखेरचा*
बुधवारी 16 रोजी झालेल्या अल्टो कार व दुचाकीच्या झालेल्या भीषण अपघातात मृत व्यक्ती हे आपल्या नातेवाईकाच्या मुलाच्या वाढदिवसानिमित्त नाशिक येथून परतत असताना दिंडोरी, वणी रॉड येथील सिडफार्म नजीकचा अपघात होऊन त्या अपघातात अल्टो मधील 7 जणावर काळाने घाला घातला असून हा वाढदिवस त्याचा खरेच वाढदिवस ठरला आहे. दिंडोरी तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.
*अपघातातील मृतांची नावे*
देविदास पंडित गांगुर्डे (28) रा. सारसाळे ता.दिंडोरी, मनीषा देविदास गांगुर्डे, (23) रा.सारसाळे ता.दिंडोरी, उत्तम एकनाथ जाधव,(42), रा.कोशिंबे, ता. दिंडोरी), अल्का उत्तम जाधव, (38) रा. कोशिंबे ता.दिंडोरी, दत्तात्रेय नामदेव वाघमारे, (45) रा.देवपूर,देवठाण ता.दिंडोरी, अनुसया दत्तात्रय वाघमारे,(40) रा. देवपूर, देवठाण ता. दिंडोरी, भावेश देविदास गांगुर्डे, (2 ) रा.सारसाळे, ता. दिंडोरी) यांचा समावेश आहे.
*एक दिवशीय बंदचे आयोजन*
जाधव, गांगुर्डे वाघमारे या तिन्ही कुटुंबाच्या अपघाती निधनामुळे कोशिंबे, देवठाण,सारसाळे या गावांमध्ये एक दिवशीय बंद पाळण्यात आला आहे. तिन्ही गावाने मध्ये शोकाकुल पाळण्यात आला. सकाळी मयत असलेल्या महिलांवर पुरुषांवर शोकाकूळ वातावरणात अंत्यविधी करण्यात आला आहे.