वैभव पगार l दिंडोरी - मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या जनता इंग्लिश स्कूल उच्च माध्यमिक विद्यालय, दिंडोरी येथे विज्ञान छंद मंडळाची स्थापना करण्यात आली.कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यालयाचे आदरणीय प्राचार्य श्री.शरद शेजवळ सर व प्रमुख पाहुणे म्हणून लोकनेते शंकर बाळाजी वाजे विद्यालयाचे पर्यवेक्षक व उत्कृष्ट विज्ञान शिक्षक,IISER पुणे चे समन्वयक श्री.करपे पी. आर.सर होते. कार्यक्रमाची सुरुवात विज्ञान गीताने विद्यालयाच्या गीत मंचाने केली.यावेळी सरस्वती माता व प्रसिद्ध भौतिक शास्त्रज्ञ सी. व्ही. रामण यांच्या प्रतिमेचे पूजन विद्यालयाचे प्राचार्य व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी इयत्ता नववीच्या विद्यार्थिनी सान्वी रायते व श्वेता शिवले यांनी न्यूटनच्या गतीविषयक नियमावर आधारित प्रात्यक्षिक सादर केले. यावेळी प्रमुख पाहुणे उपस्थित असलेले श्री.करपे सरांनी विज्ञान छंद मंडळाच्या कार्यकारणीचे उद्घाटन केले. या छंद मंडळाच्या माध्यमातून वर्षभरात विविध उपक्रम घेतले जावेत.यामध्ये विज्ञान हस्तलिखित तयार करणे. परिसरातील साखर कारखान्यांना, औद्योगिक कारखान्यांना भेट देऊन त्याच्या मागील वैज्ञानिक माहिती दिली जावी.तसेच त्यांनी विविध वैज्ञानिक संशोधकांचे लहानपणीचे जीवन व त्यांनी केलेले संशोधनकार्य यांची माहिती सांगितली. तसेच IISER पुणे, आयुका पुणे आणि इस्रो याविषयी त्यांनी माहिती विद्यार्थ्यांना करून दिली. इस्रोला जाण्यासाठी असलेली नियमावली, तेथील विविध संस्थांना भेट देऊन तेथील माहिती घेणे. विद्यार्थ्यांना भारतीय बनावटीच्या विविध उपग्रहांची माहिती सरांनी पटवून दिली.
कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यालयाचे प्राचार्य शरद शेजवळ सरांनी विज्ञान शिक्षकांनी विद्यार्थ्यांची विज्ञान विषयात आवड कशी निर्माण करता येईल याचा विचार करावा आणि त्यांना या विज्ञान छंद मंडळाच्या माध्यमातून संशोधनाची आवड निर्माण करावी. यासाठी आपल्या विद्यालयात असलेल्या नवीन साहित्याचा प्रत्यक्षअध्यापन करताना वापर करावा. त्यासाठी आवश्यक तेथे छोटे प्रयोग करून विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करण्यास निश्चित मदत होईल असे सांगितले.
या विज्ञान छंद मंडळ कार्यक्रम प्रसंगी विद्यालयाचे पर्यवेक्षक श्री. पगारे सर , श्री. टोपले सर तसेच कार्यालय प्रमुख श्री.कदम भाऊसाहेब, सर्व विज्ञान शिक्षक - शिक्षिका, विज्ञान छंद मंडळ अध्यक्ष व कार्यकारिणी सदस्य तसेच विद्यालयाची विद्यार्थी पंतप्रधान,सर्व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्तविक श्रीमती. आहेर एस.एस. यांनी केले तर सूत्रसंचालन श्रीमती.कदम मॅडम यांनी केले.
कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन श्री. गुंजाळ सर यांनी केले.