दिंडोरी l प्रतिनिधी:-‘नशा मुक्त युवा विकसित भारत संकल्प’ अभियानाची दिंडोरी शहरात प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी ५ ऑगस्ट रोजी दिंडोरी नगरपंचायत कार्यालयात महत्त्वपूर्ण नियोजन बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत शहरातील विविध शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक, पोलीस निरीक्षक, उपनगराध्यक्ष, मुख्याधिकारी व नगरपंचायतीचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या अभियानांतर्गत नशामुक्तीबाबत समाजात व्यापक जनजागृती करण्याचा मुख्य उद्देश निश्चित करण्यात आला. विद्यार्थी, शाळा, पोलीस प्रशासन आणि नगरपंचायत कर्मचारी यांच्या संयुक्त सहभागातून विविध सामाजिक कार्यक्रम राबवण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. शहरातून भव्य जनजागृती रॅली काढणे, तज्ज्ञांची व्याख्याने आयोजित करणे, स्वच्छता मोहीम राबवणे, वृक्षारोपण करणे तसेच नशामुक्तीविषयक प्रबोधनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्याचे नियोजन या वेळी करण्यात आले.
अभियानाचाच एक भाग म्हणून दिंडोरी नगरपंचायत कार्यालय, जनता महाविद्यालय, के. व्ही. एन. नाईक कॉलेज आणि गोल्डन डे स्कूल येथे व्यसनमुक्ती शपथविधीचा कार्यक्रम अत्यंत उत्साहात पार पडला. सर्व उपस्थितांसह विद्यार्थी, शिक्षक व कर्मचाऱ्यांनी अंमली पदार्थांपासून दूर राहून निरोगी व सशक्त समाज घडवण्याची सामूहिक शपथ घेतली.
नगरपंचायतीच्या या स्तुत्य उपक्रमास शहरातील सर्व मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी आणि नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून, हे अभियान संपूर्ण शहरात यशस्वी करण्याचा ठाम निर्धार या वेळी व्यक्त करण्यात आला.