दिंडोरी । मनोज पाटील :- पत्रकारांवरील हल्ल्याचा निषेध व पत्रकार संरक्षण कायद्यानुसार दोषींवर कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी दिंडोरी तालुकाहल्ल्याचा निषेध मराठी पत्रकार संघाच्या वतीने तहसिलदार मुकेश कांबळे व पोलिस निरीक्षक रघुनाथ शेगर यांना निवेदन देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की, त्र्यंबकेश्वर येथे श्री स्वामी समर्थ केंद्र कमानीजवळ पार्किग पावती गोळा करणार्या गुन्हेगार प्रवृत्तीच्या इसमांनी पत्रकार बांधवांवर हल्ला केला. या हल्ल्यात पत्रकार किरण ताजने हे जखमी झाले असून योगेश खरे, अभिजित सोनवणे यांनाही मारहाण करण्यात आली. पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे. समाजातील घडामोडी जनतेसमोर मांडणार्या पत्रकारांवर होणारे हल्ले लोकशाहीसाठी अत्यंत धोकादायक आहेत. त्यामुळे या प्रकरणात केवळ सामान्य गुन्हा नोंदविण्यापेक्षा पत्रकार संरक्षण कायदा लागू करुन दोषींवर कठोरात कठोर कारवाई होणे आवश्यक आहे. तसेच अशा गुन्हेगार प्रवृत्तीच्या इसमांना ठेका देणार्या संंबधित अधिकार्यांचीही चौकशी करुन त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात यावी, पत्रकारांवर हल्ला करणार्या गुन्हेगारांवर तातत्काळ गुन्हा नोंदवून पत्रकार संरक्षण कायद्यानुसार कारवाई करण्यात यावी, दोषींना अटक करुन न्यायालयीन प्रक्रियेतून कठोर शिक्षा व्हावी, गुन्हेगार प्रवृत्तीच्या व्यक्तींना ठेका देणार्या अधिकार्यांची चौकशी करुन जबाबदारी निश्चित करावी, पत्रकारांच्या सुरक्षिततेसाठी प्रशासनाने ठोस उपाययोजना आखाव्यात आदी मागण्यांचे निवेदन देण्यात आले आहे. निवेदनावर दिंडोरी तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष विलास ढाकणे, संस्थापक अध्यक्ष संतोष कथार, पत्रकार भगवान गायकवाड,नितीन गांगुर्डे ,अशोक निकम, किशोर जाधव, सुनील घुमरे, अशोक केंग, समाधान पाटील, संतोष विधाते, बाळासाहेब अस्वले, शांताराम पगार, गोरख जोपळे, रमाकांत शार्दुल, श्रीराम देवकर, संदीप मोगल, मनोज पाटील, प्रमोद ठेपणे, कृष्णा पवार आदी उपस्थित होते.