बोरगाव l लक्ष्मण बागुल:- सुरगाणा तालुक्यातील देवसाने ते गोगुळमार्गे रोकडपाडा जाणारा रस्ता गेल्या काही वर्षांपासून अतिशय दयनीय अवस्थेत आहे. विशेषतः मांजरपाडा प्रकल्पाच्या परिसरात तर रस्त्याची अवस्था अधिकच बिकट झाली असून, नागरिकांना गुडघाभर चिखलातून प्रवास करावा लागत आहे. मुसळधार पावसामुळे रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत, तर माती वाहून गेल्याने वाहनचालक आणि पादचारी यांना प्रचंड हाल सहन करावे लागत आहेत.
ग्रामस्थ, शालेय विद्यार्थी, शेतकरी तसेच रुग्णांना या रस्त्यावरून प्रवास करताना अतोनात अडचणींना सामोरे जावे लागत आहे. शेतकरी शेतमाल बाजारात नेऊ शकत नाहीत, तर शेतीसाठी लागणारे खत-बी-बियाणे आणण्यातही अडचण निर्माण झाली आहे. रुग्णांना वेळेत दवाखान्यात पोहोचविणे हे मोठे आव्हान ठरत असून, कधीही गंभीर अपघात होऊ शकतो, अशी भीती नागरिक व्यक्त करत आहेत.
मागील तीन-चार वर्षांपासून रस्ता दुरुस्तीचा प्रश्न कायम असून, ग्रामस्थांनी अनेक वेळा निवेदनं दिली, तक्रारी नोंदवल्या, तरीही संबंधित विभागाने अद्याप ठोस उपाययोजना केलेली नाही. परिणामी नागरिकांनी वर्गणी व श्रमदानातून दगड-खडी टाकून तात्पुरती दुरुस्ती करण्याचा प्रयत्न केला, मात्र मुसळधार पावसामुळे हे प्रयत्न निष्फळ ठरत आहेत.
प्रतिक्रिया:-
आमचा शेतमाल बाजारात कसा न्यायचा हा प्रश्न आम्हास पडला आहे. शेतीसाठी लागणारे साहित्य आणण्यासाठी सुद्धा वाहनधारक तयार होत नाहीत.
- दौलत बोबले
शेतकरी
पावसाळ्यात मुलांना शाळेत जाण्यासाठी या रस्त्यावरून चालणे धोकादायक ठरत आहे. याकडे स्थानिक प्रशासन व लोकप्रतिनिधी यांनी त्वरित दखल घ्यावी
- खंडू चौधरी
पालक
आम्ही स्वतः वर्गणी करून व श्रमदानातून दगड-खडी टाकली, पण ती उपाययोजना तात्पुरत्या । स्वरूपाची आहे. प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष घालावे व येणाऱ्या उन्हाळ्यामध्ये पक्का रस्ता बनवून द्यावा.
- चंदर चव्हाण
नागरिक