महाराष्ट्र ट्रायबल न्युज

त्र्यंबकेश्वर तालुक्यात रानभाज्यांचा महोत्सव बोरमाळ पेसा ग्रामसभेचा प्रेरणादायी उपक्रम.

देवडोंगरी l शंकर निंबारे :- दि.२ त्र्यंबकेश्वर तालुक्यातील डोंगर-दऱ्यांनी वेढलेल्या आदिवासी पट्ट्यातील देवडोंगरी पैकी बोरमाळ येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही रानभाज्यांचा महोत्सव मोठ्या उत्साहात पार पडला. बोरमाळ गावाची पेसा ग्रामसभा अंतर्गत सामूहिक वनहक्क व्यवस्थापन समिती आणि इकोनेट संस्थेच्या सहकार्याने आयोजित या महोत्सवाला तालुक्यातील मान्यवर, ग्रामस्थ आणि महिला वर्ग यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
सध्याच्या धकाधकीच्या जीवनशैलीत रानभाज्या आहारातून हळूहळू नामशेष होत चालल्या आहेत. मात्र बोरमाळ येथील ग्रामस्थांनी या परंपरेला जिवंत ठेवण्यासाठी रानभाज्यांचा महोत्सव परंपरा जपण्याचा प्रयत्न यशस्वीपणे सुरू ठेवला आहे. यंदाच्या महोत्सवातही विविध दुर्मिळ रानभाज्यांचे प्रदर्शन भरवण्यात आले होते.
   महोत्सवाची सुरुवात पारंपरिक तारपा वाद्यांच्या गजरात भव्य मिरवणुकीने झाली. विद्यार्थ्यांनी स्वागतगीत सादर करून वातावरण भारावून टाकले. त्यानंतर मान्यवरांचा ग्रामस्थांच्या हस्ते शाल-श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
     या रानभाज्या कार्यक्रमाप्रसंगी सहाय्यक गटविकास अधिकारी हेमंत बच्छाव यांनी रानभाज्यांचे आयुर्वेदिक गुणधर्म व आरोग्यदायी फायदे यांची माहिती दिली. तसेच आमदार हिरामण खोसकर यांचे चिरंजीव वामन खोसकर, भाजपा हरसुल मंडलाध्याक्ष जयराम भुसारे, वनरक्षक प्रकाश चौधरी, सरपंच व माजी पदाधिकारी यांनी रानभाज्यांचे संवर्धनाचा संदेश देत जंगल संरक्षण, पेसा कायद्याची अंमलबजावणी आणि महिला सक्षमीकरण यावर ग्रामस्थांना मोलाचे मार्गदर्शन केले.
    महोत्सवाचे वैशिष्ट्य म्हणजे महिलांचा उत्स्फूर्त सहभाग तसेच महिलांनी भरवलेले रानभाज्यांचे भव्य प्रदर्शन. यात बांबूची वासती, मोखा, पेंढर, बेलाचे लोणचे, आंबाडा, माटाची भाजी, खुरचणी, सरबल, आंबाडी, शेवग्याचा पाला, तरोटा, कुरडु, डावखुरे, टेटु, डाडलेचा पाला, कडु कांदाच्या वळी अशा विविध दुर्मिळ रानभाज्या मांडण्यात आल्या होत्या. याशिवाय नागली, तांदूळ, सितोळीच्या भाकऱ्या खेकड्याची भाजी यांसारखे स्थानिक खाद्यपदार्थही पाहुण्यांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरले. लहान थोर ग्रामस्थांसह मान्यवरांनी या पारंपरिक पदार्थांचा आस्वाद घेतला. यावेळी ग्रामसभा बडी व समिती सदस्यांनी या उपक्रमामुळे गावकऱ्यांमध्ये पर्यावरण जागरूकता आणि परंपरा जपण्याची भावना बळकट होत असल्याचे नमूद केले.
    या महोत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी संयोजकांचे योगदान लाभले. इकोनेट संस्थेचे ग्रामसभा सोबती, सामूहिक वनहक्क व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले. लेखक तुकाराम चौधरी यांनी प्रास्ताविकातून पेसा कायदा, जंगलाचे जतन व संवर्धन तसेच आदिवासींचे निसर्गाशी जुळलेले नाते व रानभाज्यांचे महत्व पटवून दिले तर ग्रामपंचायत अधिकारी सतिश बच्छाव यांनी आभार मानले. यावेळी मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.

प्रतिक्रिया 
रानभाज्या महोत्सवामुळे आदिवासी पारंपरिक आहारसंस्कृतीचे महत्त्व पटले. या उपक्रमातून निसर्गाशी जुळवून घेणारी जीवनशैली आणि आरोग्यपूर्ण आहार पिढ्यान्‌पिढ्या टिकवण्याचा संदेश मिळाला आहे. बोरमाळ पेसा ग्रामसभेचा ‘रानभाज्या महोत्सव’ नाशिक जिल्ह्यासह संपूर्ण आदिवासी भागासाठी हा उपक्रम प्रेरणादायी ठरला आहे.
मा.श्री. हेमंत बच्छाव सहाय्यक गटविकास अधिकारी त्र्यंबकेश्वर

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने