दिंडोरी l वैभव पगार :- स्वराज्य स्थापनेसाठी प्रचंड संघर्ष करून आदर्श सैनिक घडवणारे छत्रपती शिवाजी महाराजांचे शौर्य आणि अभंगांच्या माध्यमातून समाजप्रबोधन करणारे संत तुकाराम महाराज यांची संतवाणी ही आजही भारतीय सैनिक व समाजासाठी प्रेरणादायी आहे. आणि म्हणूनच शक्ती आणि भक्तीचा मिलाप म्हणजेच समाजासाठी प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन दिंडोरी तालुका माजी सैनिक परिवार संघाचे संस्थापक मेजर भारत खांदवे यांनी केले.
दिंडोरी तालुका माजी सैनिक परिवार संघटनेने कोंगाई माता मंदिरात नवरात्र उत्सवात महिला अखंड हरिनाम सप्ताहात सहभाग घेतला.व या कार्यक्रमात विशेष मान्यवरांचा सन्मान करण्यात आला त्याप्रसंगी मेजर खांदवे बोलत होते.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सबरजीष्टार संदीप भुसारी होते.
व्यासपीठावर मेजर भारत खांदवे, जनता इंग्लिश स्कुलचे प्राचार्य शरद शेजवळ, डॉ संदीप गोसावी, जेष्ठ नागरिक बाळासाहेब मुरकुटे, शिवाजी जाधव, दत्तात्रय जाधव, चोरडिया, रघुनाथ पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी सत्कारमूर्ती प्राचार्य शरद शेजवळ व डॉ संदीप गोसावी यांनी मनोगत व्यक्त करताना कोंगाई माता महिला मंडळ व माजी सैनिक संघ यांच्या कार्याचा गौरव केला.व एक आगळा वेगळा कार्यक्रम व नागरिकांना प्रेरणादायी उपक्रम होत असल्याने आयोजकांचे कौतुक केले.
यावेळी १९७१ चे युद्ध व कारगिल युद्धातील ज्येष्ठ योद्धे, तसेच माजी सैनिक संघटनेचे सर्व पदाधिकारी,कोंगाई महिला सप्ताह आयोजक ह.भ.प. सौ. सुनिता ताई जाधव , सौ. शैलेजा पालखेडे, सौ. सरलाताई बोरस्ते, सौ. रत्नाताई बोरस्ते, सौ. ललिताताई खांदवे, सौ. स्वातीताई जाधव, सौ. माया भार्गवे, विरमाता मंजुषाताई क्षीरसागर आदी मान्यवर उपस्थित होते.
या प्रसंगी माजी सैनिक परिवार संघटनेच्या वतीने व कोंगाई माता मंदिर महिला अखंड हरिनाम सप्ताह समिती यांच्या वतीने दिंडोरी जनता इंग्लिश स्कूलचे प्राचार्य शरद शेजवळ यांना आदर्श प्राचार्य पुरस्कार तसेच डॉ. संदीप गोसावी यांना समाजभूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा विशेष सन्मान करण्यात आला.कार्यक्रमाच्या शेवटी माजी सैनिक संघाच्या वतीने भाविकांना फराळाचे वाटप करण्यात आले.
सूत्रसंचलन संतोष कथार यांनी तर आभार हभप सुनीता जाधव यांनी मानले.