वांगणसुळे दौलत चौधरी :- अतिदुर्गम डोंगराळ भागात घनदाट झाडांमुळे पाऊस जास्त पडतो डोंगर उताराच्या जमिनीला आदिवासी भागात (सोंडा) म्हणतात. यावर्षी मे महिन्यापासून पाऊस लवकर झाल्याने जमीनीवर मोठ्या प्रमाणात गवत वाढून गेले होते.त्यामुळे शेतकऱ्यांनी तननाशकाचा फवारा मारल्याने गवत नष्ट झाले त्याचे सेंद्रिय खतात रूपांतर झाले त्यामुळे यंदा खीळवाड,मुरमाड काळी कसदार जमिन असलेल्या प्रदेशात जास्त प्रजण्यवृष्टीत खरीप हंगामातील उडदाची पीक भरून आली आहेत आदिवासी कवी कृष्णा राऊत म्हणतात की.
"दगडाळ धसाची नांगरणी
करू उडदाची पेरणी
पाऊस पडतो धुई धुई
सुखावते तान्हेली भुई "
डोंगर उताराला ( सोंड्याला) बैलांचे नांगर चालत नसल्याने कुदळीने अलगद खनून पेरणी करतात.त्यामुळे जमिन भुसभुशीत होते व पीकाला सेंद्रिय गवत,पालापाचोळा कुजलेल्या खताचा भर पडतो पीक जमिनीलगत पांगते व मोठे होते.सपाट माळरानावर चिखलणी झाल्यावरही अळवट देऊन उडीद पेरणी केली जाते. ते पीक जास्त मोठे होत नाही.ऑगस्ट महिन्यात पीकाच्या उत्पन्नासाठी गवत निंदणी केली जात होती.परंतु यंदा तननाशकाचा फवारा मारल्याने आधीच गवत पुर्ण वाळून गेले त्याचा फायदा असा की गवत निंदणीची गरज भासली नाही आदिवासी भागातील शेतकरी लहान दाण्याच्या पीकाला घुल्या उडीद म्हणतात. तर बाजारी मोठे कडधान्य असलेल्या उडीद पीकाला पावसा उडीद म्हणतात.साधारण आक्टोंबर उडदाला पीवळी फुलं येऊन शेंगा यायला सुरुवात होते. अशा वेळी जंगलातील माकड शेंगा खाण्यासाठी येतात उडीद हे पाच महिन्याचे कडधान्य पीक नोव्हेंबर महिन्यात काढले जाते उडदाच्या भाऱ्याला आदिवासी भागात 'काटळ' म्हणतात.उडदाची काढणी हिवाळ्यात सकाळी थंड वातावरणात केली जाते. त्यामुळे शेंगा फुटत नाही उडदाची मळणी खळ्यावर केली जाते काही ठिकाणी ट्रॅक्टरने करतात तर काही ठिकाणी झाडाच्या जाड फांद्या तोडून (टेमक्याने) झोडपणी केली जाते त्याला गार म्हणतात.उडदापासून वेगवेगळे पदार्थ बनवले जातात. पापड, मेदू वडा,इडली,डोसा ह्या पदार्थांचा वापर गावरान, पंजाबी उपहारगृहात (हॉटेलमध्ये) मोठ्या प्रमाणात होत आहे.आदिवासी भागातील शेतकरी, कष्टकरी समाजातील घराघरात उडदाचे पातळ दाळ कालवण पीठले आहारात मोठ्या प्रमाणात केले जाते.उडदापासून वडे बनवतात. भाजल्यालेल्या उडदापासून भुज्या बनवतात ते लोक पीठ पाण्यात कालवून खातात उडदात दुष्काळात आहारात हिरव्या पालेभाज्यांची अडचण झाल्यामुळे लोकानी उडदावर दिवस काढले होते. कॅल्शियम,लोह, जीवनसत्व 'ब' मॅग्नेशियम, पोटॅशियम पोटातील आजार, सांधे दुखी,गुडगे दुखी हे आजार बरे होतात. बाजारात उडदाला मोठ्या प्रमाणात मागणी आहे. मळलेल्या उडदाच्या कुटाला आदिवासी भागात बरकल म्हणतात जनावरं बरकल आवडीने खातात ह्या वर्षी महिन्यापर्यंत पाऊस लवकर झाल्यामुळे उडीद पीकाला जास्त बहर आला आहे. मागील वर्षाच्या पेक्षा यंदा जास्त उत्पन्न होण्याची शेतकऱ्यांना अपेक्षा आहे. अशी माहिती आदिवासी संस्कृती संवर्धक अभ्यासक सुभाष कामडी यांनी दिली आहे.