म्हेळुस्के l गोरख जोपळे:-मुंबई येथे आझाद मैदानावर मराठा समाजाच्या मागण्यांसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरू आहे.आंदोलनाचा तिसरा दिवस असून राज्यशासनाने व महापालिकेने आंदोलन कर्त्यांची जेवणासह पिण्याच्या पाण्याची सोय केली नसल्याचा आंदोलन कर्त्यांचा आरोप असल्याच्या बातम्या सोशल मिडियावरती प्रसारीत झाल्या.
या पार्श्वभूमीवर दिंडोरी तालुक्यातून दिंडोरी कृषी बाजार समितीचे सभापती प्रशांत कड, उपसभापती योगेश बर्डे,मराठा महासंघाचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब घडवजे यांच्या नेतृत्वाखाली बैठक होऊन मुंबई येथील आंदोलनकर्त्या समाज बांधवांची खाण्या-पिण्याची गैरसोय होऊ नये याकरिता अन्न,पाणी,चिवडा,भत्ता पाकिट,केळी यांसारख्या जीवनावश्यक वस्तू पोहच करण्याकरिता आवाहन करण्यात आले होते.या आवाहनाला मराठा समाजासह इतरही समाजाने भरभरून प्रतिसाद देत शक्य होईल ती मदत केली.विशेष म्हणजे पहिल्याच दिवशी दिंडोरी तालुक्यातून कसबे वणी,म्हेळुस्के,हस्तेमाळे,पांडाने,मावडी,वरखेडा, मडकीजांब,अहिवंतवाडी, रासेगाव,जोरण,वणी खुर्द,कोचरगाव या गावांतून तब्बल दहा ते बारा पिक अप गाडी भरून मुंबईकडे अन्न-पाणी घेऊन रवाना करण्यात आल्या.मदतीचा ओघ सुरूच असून अनेक गावातील दानशूर व्यक्तींसह नागरिकांनी मदत करण्याची इच्छा व्यक्त केल्याने यापुढे आंदोलन सुरू असेपर्यंत दररोज किमान एक पिकअप गाडी भरून अन्न व पाणी पोहच करण्याचे नियोजन करण्यात आले असल्याचे सभापती प्रशांत कड,उपसभापती योगेश बर्डे यांनी सांगितले आहे.