महाराष्ट्र ट्रायबल न्युज

ई - पीक पाहणी मुदत वाढवण्यासाठी प्रयत्न करु : ना. झिरवाळ दिंडोरी तहसिल कार्यालयात आढावा बैठक संपन्न

दिंडोरी । प्रतिनिधी :- दिंडोरी तालुक्यात शेतकर्‍यांचे नुकसान मोठ्या प्रमाणात झाले असून शेतकर्‍यांना मदत करण्यास शासन कटिबद्ध आहे. अजूनही शेतकर्‍यांचे पंचनामे बाकी आहे. त्याचबरोबर फोटोसहीत पंचनामे ऑनलाईन करण्याची मुदत ही संपत असेल तरी पुढील काळात ही मुदत वाढवण्यासाठी प्रयत्न करु, असे आश्‍वासन राज्याचे अन्न व औषध प्रशासन व विशेष सहाय्य मंत्री नरहरी झिरवाळ यांनी केले.
   दिंडोरी तहसिल कार्यालयात आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. या आढावा बैठकीत ना. झिरवाळ बोलत होते. दिंडोरी तालुक्यात फक्त 30 टक्के ई पीक पाहणी झाली आहे. अजून 70 टक्के ई पीक पाहणी बाकी आहे. परंतू आज रोजी मुदत संपणार असल्याने ना. नरहरी झिरवाळ यांनी कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याशी संपर्क करुन ई - पीक विमा करण्यासाठी मुदत वाढवण्याची मागणी केली. ई - पीक करण्यासाठी ऑनलाईन अनेक अडचणी येत आहे. त्यामुळे अनेक शेतकर्‍यांची ई - पीक पाहणी झालेली नाही. तसेच कुर्णोली येथील शेतकर्‍यांनी खडकसुकेणे ते कुर्णोली रस्ता वादाचा असल्याने तो अनेक दिवसांपासून रस्ता बंद आहे. त्यामुळे शेतकर्‍यांना अनेक संकटांना सामोरे जावे लागत असल्यामुळे तो रस्ता खुला करण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली. यावेळी कादवा कारखान्याचे चेअरमन श्रीराम शेटे यांनी सुध्दा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्‍यांना विचारणा केली की, रस्त्याच्या कडेला विजेचे खांब उभे केले जातात, परंतू त्यावेळी परवानगी घेतली जाते की नाही? कारण अनेक रस्त्याच्यालगत खांब उभे केेले जातात. त्यामुळे अपघातांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे रस्त्यांची पाहणी करुन परवानगी देण्यात यावे, असे शेटे यांनी सांगितले. तसेच दिंडोरी - मडकीजांब - उमराळे या रस्त्याची अतिशय दयनिय अवस्था झाली. रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्याने अपघातांना सामोरे जावे लागत असल्याने त्वरीत रस्त्याची दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी यावेळी ग्रामस्थांनी केली. त्यानंतर पालखेड बंधारा - लोखंडेवाडी रस्त्याचीही बिकट अवस्था झाली आहे. दिड कि.मी. रस्ता असा आहे की सार्वजनिक बांधकाम विभाग म्हणते तो रस्ता जिल्हा परिषदेकडे येत असल्यामुळे तो वादाच्या भोवर्‍यात पडला आहे. त्यामुळे या रस्त्याचा प्रश्‍न लवकरात लवकर मार्गी लावावा, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे. तसेच जानोरी येथील नाशिक विमानतळसमोरील कंपनीने नाल्यात पाईप टाकल्याने परिसरातील शेतकर्‍यांचे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे त्वरीत संबंधित कंपनीची चौकशी करुन कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली. याप्रसंगी दिंडोरी - पेठ उपविभागीय अधिकारी डॉ. आप्पासाहेब शिंदे, तहसिलदार मुकेश कांबळे, गटविकास अधिकारी भास्कर रेंगडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे गौरव जगताप, चौधरी, ज्येष्ठ नेते बाळासाहेब जाधव, विश्‍वासराव देशमुख, कैलास मवाळ, राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष राजेंद्र उफाडे, माजी जिल्हा परिषद गटनेते प्रवीण जाधव, सुरेश कळमकर, प्रकाश वडजे, नरेंद्र जाधव आदींसह सर्व पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने