बोरगाव l लक्ष्मण बागुल:- गावातील नागरिकांच्या आरोग्य जपणुकीसाठी हरणगाव ग्रामपंचायत यांनी दि. 16सप्टेंबर 2025 रोजी गावात मोफत आरोग्य शिबीर आयोजित केले. या शिबिरात डॉ.रोहिणी पटेल,डॉ. मीनाक्षी महाजन, डॉ.आशुतोष मुनेश्वर, डॉ.मथुरा मयेकर तज्ञ डॉक्टरांनी उपस्थित राहून नागरिकांची तपासणी केली.
शिबिरामध्ये रक्तदाब, मधुमेह, नेत्र तपासणी, हिमोग्लोबिन चाचणी तसेच महिलांच्या व मुलांच्या आरोग्यविषयक तपासण्या करण्यात आल्या. लहान मुलांना लसीकरणाची सोयही उपलब्ध करून देण्यात आली.
शिबिरात मोठ्या संख्येने ग्रामस्थांनी तसेच माध्यमिक, प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यानी उत्स्फूर्त सहभाग घेतला. तपासणीसह रुग्णांना मोफत औषधेही देण्यात आली. आरोग्याबाबत जनजागृती करण्यासाठी माहितीपत्रके वाटण्यात आली तसेच जोगमोडी च्या आरोग्य अधिकारी डॉ. रोहिणी पटेल मॅडम यांनी आरोग्य टिकवण्यासाठी योग्य आहार व जीवनशैलीविषयी मार्गदर्शन केले. तसेच महिलांनी आपल्या आरोग्याबाबत विशेष काळजी कशी घ्यावी याविषयी सखोल असे मार्गदर्शन केले.
या उपक्रमामुळे ग्रामस्थांमध्ये आरोग्याविषयी जागरूकता निर्माण होऊन आजारांचे लवकर निदान व उपचार होण्यास मदत झाली. असे मत ग्रामपंचायत अधिकारी मोहन गायकवाड यांनी व्यक्त केले ग्रामस्थांनी अशा शिबिरांचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले. यावेळी ग्रामपंचायत हरणगावच्या सरपंच पल्लवीताई विजय भरसट, उपसरपंच हिम्मतराव भोये,माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक धनंजय चव्हाण, ग्रामपंचायत सदस्य, आरोग्य सेवक, विजय भरसट, युवराज पवार, विश्वनाथ ठेपणे, चिंतामण जाधव, ग्रामस्थ उपस्थित होते.