महाराष्ट्र ट्रायबल न्युज

दिंडोरी ग्रामीण रुग्णालयाची 108 रुग्णवाहिका दुरुस्त करा : नगरसेवक नितीन गांगुर्डे

दिंडोरी । प्रतिनिधी :- दिंडोरी ग्रामीण रुग्णालयाची 108 रुग्णावाहिका ही धुळखात पडून असून त्यामुळे रुग्णांना वेळेवर मदत मिळण्यास अडचणी येत आहे. ही रुग्णवाहिका तातडीने दुरुस्ती करावी, त्याचप्रमाणे दिंडोरी तालुक्यातील अनेक प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये औषधांचा तुटवडा जाणवत असल्याने त्वरीत औषधांचा पुरवठा सुरळीत करण्यात यावा, अशी मागणी दिंडोरी नगरपंचायतीचे नगरसेवक नितीन गांगुर्डे यांनी केली आहे. 
    दिंडोरी शहर हे नाशिक - सुरत महामार्गावर महत्त्वाचे ठिकाण असून येथे रहदारी मोठ्या प्रमाणात असते. सप्तशृंगगडावरही पर्यटक मोेठ्या संख्येने ये - जा करत असतात.तसेच सापुतारा, हतगड येथे पर्यटक मोठ्या संख्येने जात असतात. रस्ता दोन पदरीचा असल्याने अपघाताचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळे वेळेवर अनेकदा रुग्णवाहिका उपलब्ध होत नाही. त्यामुळे खाजगी रुग्णालयातील रुग्णवाहिकांची मदत घ्यावी लागते. अनेक सामान्य रुग्णांना सुध्दा वेळेनुसार खाजगी रुग्णालयातच दाखल व्हावे लागते. त्यामुळे रुग्णांना आर्थिक फटका बसतो. सरकारने ग्रामीण तसेच शहरी भागातील रुग्णांना तातडीची मदत मिळावी म्हणून 108 रुग्णवाहिका सेवा सुरू केली आहे. परंतु, गेल्या काही महिन्यांपासून दिंडोरी ग्रामीण रुग्णालयातील 108 रुग्णवाहिका ही एका गॅरेजमध्ये अनेक दिवसांपासून उभी आहे. तिच्या किरकोळ दुरुस्तीला खर्च मंजूर होत नसल्याचे समजते. परंतू रुग्णांची गैरसोय होवू नये, यासाठी 108 रुग्णवाहिकेची दुरुस्ती तातडीने करावी, अशी मागणीही नगरसेवक नितीन गांगुर्डे यांनी केली आहे. त्याचप्रमाणे दिंडोरी तालुक्यातील अनेक प्राथमिक आरोग्य केंेद्रांमध्ये औषधांचा तुटवडा जाणवत आहे. अनेक ठिकाणी सर्दी, खोकला यांचे औषध मिळत नाही. काही रुग्णालयामध्ये रेबीज, सर्प दंश यांची लस उपलब्ध नाही. त्याचबरोबर दिंडोरी ग्रामीण रुग्णालयात सुध्दा मागील काळात रेबीज लस मिळत नव्हती. त्यावेळी सामाजिक कार्यकर्ते विक्रम मवाळ यांनी टिटी व रेबीजचे डोस उपलब्ध करुन दिले होते. आताही अनेक ठिकाणी टिटीचे सुध्दा इंजेक्शन उपलब्ध नाही. रुग्णांना खाजगी ठिकाणाहुन आणावे लागतात. दिंडोरी येथील हिंदुहद्यसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना येथे डॉक्टर चार महिन्यांपासून उपलब्ध नाही. त्यामुळे रुग्णांना खाजगी दवाखान्याचा आधार घ्यावा लागत आहे. तरी रुग्णवाहिका तातडीने दुरुस्ती करावी, औषधांचा पुरवठा सुरळीत करण्यात यावा, दिंडोरी येथील हिंदुहद्यसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना येथे डॉक्टरची नेमणूक करण्यात यावी, अशी मागणी दिंडोरी नगरपंचायतीचे नगरसेवक नितीन गांगुर्डे यांनी केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने