बाऱ्हे l नामदेव पाडवी :-सुरगाणा तालुक्यातील एकात्मिक बाल विकास प्रकल्प बाऱ्हे यांच्या विद्यमाने बाऱ्हे ग्रामपंचायत सरपंच वैशाली गावीत यांच्या अध्यक्षतेखाली ८वा राष्ट्रीय पोषण माह कार्यक्रम संपन्न झाला. त्यात "सही पोषण,देश रोषणचा नारा देण्यात आला.
ग्रामीण रूग्णालय बाऱ्हे ते बिरसा मुंडा चौक पर्यंत प्रभातफेरी काढून सही पोषण देश रोषण, कुपोषण निर्मूलन झालंच पाहिजे, शिकलेली आई घराला पूढे नेई, झाडे लावा झाडे जगवा, एक पेड माँ के नाम अशा विविध घोषणांनी बाऱ्हे परिसर दणाणून सोडला. यात पोषण माह व मासिक सभेचे आयोजन केले होते. तसेच अंगणवाडी पर्यवेक्षिका व अंगणवाडी सेविका यांनी बांबू (वास्ती),शेवग्याची कोवळी पाने,आळू,तेरा,कुरडू,कोयची (कंद),दिहगडी अशाप्रकारे विविध जंगलातील पौष्टिक रानभाज्या, शेंगदाणा लाडू, नागलीचे लाडू, बांबू (वास्ती),कूरडू, डांगर, शेवगा थालीपीठ, शेवगा पराठा, नागलीची भाकर, शेवग्याची पोळी, शेंगदाणा गुळ पोळी अशा विविध प्रकारचे पौष्टिक पदार्थाचे प्रदर्शन मांडण्यात आले होते. ते बघून उपस्थित प्रमुख मान्यवर व अधिकारी यांनी रानभाज्या व पौष्टिक आहाराचा आस्वाद घेतला व अंगणवाडी सेविकांचे तोंडभरून कौतुक केले.
कुपोषणावर मात करण्यासाठी पोषण माहमध्ये राबविण्यात येणारे उपक्रम आणि त्यासाठी सर्वांचा सहभाग महत्त्वाचा आहे.परंतु केवळ पोषण माह कार्यक्रम पुरतेच नव्हे तर कायमचेच काम करत कुपोषणाला हरवण्याचा निर्धार करा. आदिवासी भागातील कुपोषणाला हटविण्यासाठी जंगलातील रानभाज्या मधील पोषक घटक महत्त्वाचे आहेत. प्रत्येक अंगणवाडीतील शालेय पुर्व शिक्षण उत्कृष्ट व्हावे हे आपले स्वप्न आहे. असे मत डॉ.राजेंद्र बोरसे यांनी व्यक्त केले.
'सही पोषण, देश रोशन' ही संकल्पना भारत सरकारच्या ८वा राष्ट्रीय पोषण माह २०२५ या मोहिमेचा एक भाग आहे, ज्याचा उद्देश देशातील नागरिकांना योग्य पोषण आणि निरोगी जीवनशैलीबद्दल जागरूक करणे आहे. दरवर्षी सप्टेंबर महिना 'राष्ट्रीय पोषण माह' म्हणून साजरा केला जातो. लहान मुले, गर्भवती महिला आणि स्तनदा माता यांच्यामधील कुपोषणाचे प्रमाण कमी करणे निरोगी खाण्याच्या सवयींना प्रोत्साहन देणे.निरोगी शरीरातच निरोगी मन वास करते, त्यामुळे योग्य पोषण मिळाल्यास एक सुदृढ आणि सशक्त राष्ट्र निर्माण होईल.योग्य आणि संतुलित आहार, देश प्रकाशित होईल, म्हणजेच देशाची प्रगती होईल आणि तो उज्ज्वल होईल. जर प्रत्येक व्यक्तीला योग्य पोषण मिळाले, तर तो निरोगी राहील आणि त्यातून देशाची प्रगती होईल, ज्यामुळे देशाचे भविष्य उज्ज्वल होईल.या अभियानांतर्गत अनेक उपक्रम राबवले जातात, ज्यात पुढील गोष्टींचा समावेश असतो मुलांमध्ये पौष्टिक आहाराच्या सवयी लावणे. स्थानिक पातळीवर उपलब्ध असलेले आणि पौष्टिक असलेले पदार्थ वापरण्यास प्रोत्साहन देणे अशी माहिती पर्यवेक्षिका श्रीम.पुष्पा टोपले यांनी दिली.यावेळी सरपंच श्रीम.वैशाली गावीत,ग्रामीण रूग्णालय बाऱ्हे अधीक्षक डॉ.राजेंद्र बोरसे,अंगणवाडी पर्यवेक्षिका मनिषा पवार, श्रीम.जीजा भोये यांच्यासह अंगणवाडी सेविका,मदतनीस, बालविकास प्रकल्प बाऱ्हे अधिकारी, कर्मचारी, ग्रामीण रूग्णालय बाऱ्हे कर्मचारी आदी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक पर्यवेक्षिका श्रीम.पुष्पा टोपले यांनी केले.