दिंडोरी l मनोज पाटील :-शाळेच्या शैक्षणिक विकासात शिक्षकांचा मोलाचा वाटा असून प्रामाणिक काम करणाऱ्या शिक्षकांना ग्रामस्थांची मदत झाल्यास सर्व शाळांचा सर्वांगीण व गुणात्मक विकास होईल व ग्रामीण भागातील विद्यार्थी उच्च शिक्षण घेऊन मोठ्या पदावर जातील, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नामदार नरहरी झिरवाळ यांनी केले.
दिंडोरी पंचायत समिती शिक्षण विभागाच्या वतीने मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियान टप्पा 2 अंतर्गत यश मिळविलेल्या शाळांचा तसेच नवोदय व शिष्यवृत्ती परीक्षेत यश मिळविलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा, विविध क्षेत्रात विशेष प्राविण्य मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा, गुणवंत शिक्षकांचा, राज्य पुरस्कारप्राप्त व आंतरराष्ट्रीय स्तरावर विशेष कामगिरी केलेल्या शिक्षकांचा गौरव सोहळा क्रांतिवीर व्ही एन नाईक कॉलेज मध्ये आयोजित करण्यात आला होता.
यावेळी मंत्री झिरवाळ बोलत होते.
पुढे ते म्हणाले की, “गुणवत्तापूर्ण शिक्षण हा समाज प्रबोधनाचा पाया आहे. शिक्षकांनी मनापासून दिलेले शिक्षणच विद्यार्थ्यांना उज्ज्वल भविष्याकडे घेऊन जाते. ग्रामीण भागातील शाळा सक्षम आणि गुणवत्तापूर्ण बनवण्यासाठी ग्रामस्थ, पालक आणि शाळा व्यवस्थापन समिती यांनीही जबाबदारीने सहभागी व्हावे. शाळा हा केवळ शिक्षण देण्याचा केंद्रबिंदू नसून समाज घडविण्याचे केंद्र आहे. त्यामुळे शिक्षक आणि ग्रामस्थ यांच्या एकत्रित प्रयत्नांतून आदर्श शाळा घडवता येईल.”
झिरवाळ यांनी विद्यार्थ्यांना उद्देशून सांगितले की, “शिक्षण घेताना मेहनत, प्रामाणिकपणा आणि जिद्द या तीन गुणांचा अवलंब करा. या गुणांमुळेच स्पर्धा परीक्षा, शिष्यवृत्ती परीक्षा तसेच उच्च शिक्षणाच्या संधी मिळतात. ग्रामीण भागातील विद्यार्थी मोठी स्वप्ने बाळगून ती पूर्ण करू शकतात, यासाठी शासन सतत तुमच्या पाठीशी आहे.”
तसेच त्यांनी उपस्थित शिक्षकांचा गौरव करताना नमूद केले की, “राज्य व राष्ट्रीय स्तरावर शिक्षकांनी केलेली कामगिरी अभिमानास्पद आहे. समाजाचा कणा मजबूत करण्याचे काम शिक्षक करत आहेत. भविष्यातील पिढी घडवण्याची जबाबदारी शिक्षकांवर असल्यामुळे त्यांचा सन्मान करणे म्हणजे ज्ञानाचा गौरव करणे होय.”
यावेळी नामदार नरहरी झिरवाळ,मविप्र संचालक प्रवीण नाना जाधव, गटविकास अधिकारी भास्कर रेंगडे, गटशिक्षणाधिकारी चंद्रकांत गवळी, कादवा संचालक बाळासाहेब जाधव, विश्वासराव देशमुख, माजी उपनगराध्यक्ष कैलास मवाळ,सरपंच नरेंद्र जाधव ,रवींद्र मोरे, प्राचार्य शरद शेजवळ आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रास्तविक गटशिक्षणाधिकारी चंद्रकांत गवळी यांनी केले.प्रास्तविकात गवळी यांनी दिंडोरी तालुक्यातील शिक्षण विभागातील कामकाजाची व गुणवत्तेची माहिती सांगितली व कार्यक्रमाचा उद्देश सांगितला.
अवनखेड चे सरपंच नरेंद्र जाधव यांनी मनोगत व्यक्त करताना शैक्षणिक कामकाज व अडचणी यावर मत व्यक्त करून शैक्षणिक हब तालुक्यात होण्यासाठी प्रयत्न करावे अशी मागणी केली.
यावेळी इयत्ता 5वी नवोदय,5वी ,8वी स्कॉलरशिप शिष्यवृत्ती परीक्षेत यश मिळविले विद्यार्थी,माझी शाळा सुंदर शाळा टप्पा,शासकीय गट, खाजगी शाळा गट प्रत्येकी तीन जिल्ह्यात द्वितीय केंद्र स्तरावर प्रथम आलेले सर्व शाळा,गुणवंत शिक्षक,विशेष उल्लेखनीय वेगवेगळे पुरस्कारथी 6,विशेष नैपुण्य शिक्षक गौरव, 9
आदर्श शाळा 2,राज्यस्तर पुरस्कार मिळविलेल्या सर्वाना नामदार नरहरी झिरवाळ यांच्या हस्ते सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
सूत्रसंचालन राजेंद्र उगले यांनी तर आभार विस्तारअधिकारी कैलास पगार यांनी मानले.
यावेळी तालुक्यातील विविध गावातील सरपंच,उपसरपंच, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष,सदस्य, शिक्षणविस्तार अधिकारी केंद्रप्रमुख,प्राचार्य, मुख्याध्यापक, विध्यार्थी,पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.