दिंडोरी । प्रतिनिधी:- दिंडोरी शहरात भरपावसातही दसरा सिमोलंघनाची परंपरा पार पडली.
दरवर्षी शासकीय अधिकार्यांच्या हस्ते गढी गणपतीची पूजा होवून सिमोलंघनाची परंपरा आहे. या परंपरेला पेशवेकालिन इतिहास आहे. पेशवेकाळापासून शासकीय अधिकारी गणपती गढीचे शासकीय पूजन करतात. गणपतीचे दर्शन घेवून खंडेराव मंदिरापर्यंत सिमोलंघन करतात. यावर्षीही शासनाच्या वतीने तहसिलदार मुकेश कांबळे, पोलिस निरीक्षक रघुनाथ शेगर यांच्या हस्ते गणपती गढी येथे शासकीय महापूजा झाली. शर्मीच्या वृक्षाखाली असलेल्या या गणपती मंदिरात तहसिलदार मुकेश कांबळे, पोलिस निरीक्षक रघुनाथ शेगर, दिंडोरीकरांच्या वतीने चंद्रकांत राजे यांनी पूजा करुन शेतकर्यांवरील संकट दूर करण्याची मागणी केली. त्याचबरोबर दिंडोरीकरांच्या सुखसमृध्दीसाठी प्रार्थना केली. त्यानंती सिमोलंघनंास सुरवात झाली. हनुमान मंदिर, शनी मंदिर येथे नारळ वाढवण्यात आले. त्यानंतर सर्व शासकीय अधिकारी पथक, ग्रामस्थ दिंडोरी गावातून निघाले. यावेळी जोरदार पाऊस सुरु झाला. तरी सुध्दा तहसिलदार मुकेश कांबळे यांनी परंपरा सुरु राहण्यासाठी भर पावसात सिमोलंघन सुरु ठेवले. दिंडोरी न्यायालयाजवळ तहसिलदारांच्या हस्ते नारळ वाढवण्यात आले. निळवंडी रोड येथील खंडेराव मंदिरात दर्शनाने सिमोलंघनाची सांगता झाली. शासकीय अधिकार्यांनी व ग्रामस्थांनी एकमेंंकाना दसर्यांच्या शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी ज्येष्ठ नेते बाळासाहेब जाधव, चंद्रकांत राजे, नगरसेवक नितीन गांगुर्डे, सुजित मुरकूटे, शिरीष देशपांडे, विलास देशमुख, सिताराम जाधव, विजय पिंगळ, माधवराव सांळूखे, पोलिस हवालदार कृष्णा भोये, मंडल अधिकारी भारती रकिबे, रणजित देशमुख, तुषार वाघ, मनोहर पवार, संजय कुमावत, पवन देशमुख, किशोर देशमुख, निशांत शिरसाठ, तलाठी भदाणे आदी उपस्थित होते.