महाराष्ट्र ट्रायबल न्युज

ओला दुष्काळ जाहीर करावा, या मागणीसाठी वणीत रास्तारोको आंदोलन

वणी l प्रतिनिधी :- ओला दुष्काळ जाहीर करावा व शेतकऱ्यांचे सरसकट पंचनामे करावे अशी प्रमुख मागणी करीत वणी कळवण चौफुलीवर शेतकरी बांधवांनी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. गेल्या पाच महिन्यापासून दिंडोरी तालुक्यात तसेच वणी परिसरात पडणाऱ्या पावसान शेतकरी अडचणीत आला आहे. हातात आलेले कांदा पीक शेतातच भिजले गेले होते. त्याचप्रमाणे टोमॅटो व द्राक्ष पिकांचे देखील मोठे नुकसान झाले. भविष्यात येणारे द्राक्षपिक येते की नाही याबाबत शेतकरी बांधवांच्या मनात शंका आहे. मोठ्या प्रमाणावर पर्जन्यवृष्टी झाली तरी महसूल विभागाचा कुठलाही अधिकारी बांधावर फिरकला नाही. शासनाने सरसकट पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी प्रमुख मागणी याप्रसंगी करण्यात आली. त्याचप्रमाणे द्राक्ष पिकाला दिड लाख रुपये भाजीपाला पिकाला पन्नास हजार रुपये एकरी नुकसान भरपाई द्यावी अशी प्रमुख मागणी करण्यात आली.याप्रसंगी शेतकरी बांधवांनी रस्त्यावर टोमॅटो कांदे टाकून निषेध केला. सरकारकडून करण्यात येणारे पंचनामे वरचेवर झाले असून प्रत्यक्ष शेतात जाऊन पंचनामे करण्याची मागणी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रशांत कड यांनी केली.
             शासनाकडून देण्यात येणारी मदत ही तुटपुंजी असून शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसू नका व निवडणुकीच्या आधी शेतकऱ्यांना दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करा अशी मागणी ओझरखेडचे सरपंच गंगाधर निखाडे यांनी केली.
               शेतकऱ्यांनी कारखान्यावर आणलेल्या उसाच्या पिकाच्या पैशातून मदत करणे हे चुकीचे आहे असे उपसभापती योगेश बर्डे यांनी सांगितले.
                सुमारे दीड तास झालेल्या या आंदोलनात संतोष रेहरे, आबासाहेब देशमुख , उत्तम जाधव , आनंदा चौधरी, चिंधु पाटील पगार आदींसह परिसरातील शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. या रास्ता रोको आंदोलनामुळे रस्त्यावर वाहनांच्या दुतर्फा रांगा लागल्या होत्या. या आंदोलनाचा फटका सप्तश्रृंग गडावर दर्शनासाठी जाणाऱ्या प्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा शेट्टी यांना देखील बसला. याप्रसंगी नायब तहसीलदार वसंत ढुमसे यांना शेतकऱ्यांनी निवेदन दिले. स.पो.नि. गायत्री जाधव यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला. आलेल्या रुग्णवाहिकेस रस्ता मोकळा करून देत माणुसकीचे दर्शन घडविले. आंदोलनानंतर काही वेळातच वणी पोलिसांकडून वाहतूक सुरळीत करण्यात आली.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने