महाराष्ट्र ट्रायबल न्युज

सुरगाणा तालुक्यात भूकंपाचे अतिसौम्य धक्के मेरी येथील केंद्रात २.१ रिश्टर स्केल इतकी नोंद

सुरगाणा l प्रतिनिधी :- सुरगाणा तालुक्यातील घाटमाथा परिसरात गुरुवारी रात्री (दि. २) दोन वेळा भूकंपाचे अतिसौम्य धक्के जाणवले. त्यामुळे वांजुळपाडा, नागशेवडी, मोहपाडा, चिराई आणि शिंदे गाव परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. प्रशासनाने नागरिकांना सावधानता बाळगण्याचे आवाहन केले आहे.
    मेरी येथील भूकंप मापन केंद्रातील नोंदीनुसार या धक्क्याची तीव्रता अत्यंत सौम्य म्हणजेच २.१ रिश्टर स्केल इतकी नोंदवली गेली आहे. गुरुवारी रात्री सव्वानऊ वाजता पहिला आणि साडेअकरा वाजता भूकंपाचा दुसरा अति सौम्य धक्का जाणवला. या भूकंपामुळे कोणत्याही प्रकारचे नुकसान झाले नसल्याचे सूत्रांच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे. गेल्या महिन्यात १६ सप्टेंबर रोजी देखील घाट माथ्यावर भूकंपाचे धक्के बसल्याची चर्चा होती. मात्र त्याची मेरी येथील भूकंप मापन केंद्रात अधिकृत नोंद झाली नव्हती. तहसीलदार रामजी राठोड यांनी ग्रामसभांच्या माध्यमातून सतर्कतेचा सल्ला देत, सुरक्षेचे निकष पाळण्याचे आवाहन या भागातील नागरिकांना केले आहे. या भागात यापूर्वीही अशा सौम्य भूकंपाचे धक्के जाणवल्याचे सरपंच पुंडलिक पवार यांनी सांगितले. ग्रामस्थांनी पुरेशी काळजी घेण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने