दिंडोरी । प्रतिनिधी:- दिंडोरी तालुक्यातील कोर्हाटे रस्त्यावरील नवनाथ कदम यांच्या वस्तीवर पहाटे सुमारास बिबट्याने वासरावर हल्ला करत त्यास ठार केले. दुसर्या घटनेत जांबुटके शिवारात मोटरसायकलस्वारांना बिबट्याने जखमी केले आहे. त्यामुळे शेतकर्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
दिंडोरी तालुक्यातीलजांबुटके परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून बिबट्याचे वास्तव्य आहे. जांबुटके, वनारवाडी, मडकीजांब, निळवंडी, दिंडोरी, हातनोरे परिसरात बिबट्या कायम फिरत राहतो. आज संध्याकाळी जांबुटके येथील शेतकरी चेतन दत्तू कराटे पवन सुरेश कराटे हे मोटरसायकलने चालले असता बिबट्याने अचानक त्यांच्यावर झडप घातली. त्यात दोघेजण जखमी झाले. दोघांनाही दिंडोरी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. या ठिकाणी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अनुष्का गिरासे यांनी त्यांच्यावर उपचार केले. चेतन कराटे यांच्या पायाला व मांडीला बिबट्याने चावा घेतल्याने जखम झाली आहे. त्यांच्यावर उपचार केल्यानंतर त्यांना नाशिकला अधिक उपचारासाठी पाठवण्यात आले आहे. दुसरा युवक पवन सुरेश कराटे याला बिबट्याने नख मारले असून त्याला उपचारानंतर घरी सोडण्यात आली आहे. बिबट्याने हल्ला केल्यानंतर पळ काढला. शेतकर्यांनी बिबट्याचा पाठलाग केला परंतु बिबट्या सापडला नाही. दुसर्या घटनेत कोर्हाटे येथील नवनाथ कदम यांच्या वस्तीवर सकाळच्या सुमारास बिबट्याने वासरावर हल्ला करुन ठार केले आहे. कदम यांनी या घटनेची वन विभागाचे अधिकारी अशोक काळे यांना दूरध्वनी करून बिबट्याबाबत माहिती दिली. काळे यांनी तात्काळ पिंजरा उपलब्ध करुन दिला. वनपाल दळवी यांनी पिंजरा लावल्याने येथील शेतकर्यांनी अशोक काळे व दळवी यांचे आभार मानले आहे.