महाराष्ट्र ट्रायबल न्युज

शिक्षक दिनाचे औचित्य साधून ज्ञानगंगा विद्यालयात क्रीडा शिक्षक बी.बी. आहेर सम्मानित; क्रीडा सेवा पुरस्कार मिळाल्याबद्दल सत्कार सोहळा संपन्न.

इगतपुरी l विक्रम वारूंगसे:- माणिकाखांब, दि. ५ - माणिकाखांब येथील ज्ञानगंगा माध्यमिक विद्यालयात शिक्षक दिनाचे औचित्य साधून क्रीडा सेवा पुरस्कार विजेते क्रीडा शिक्षक बी.बी. आहेर यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
    महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा व युवक सेवा विभागातर्फे क्रीडा सेवा पुरस्काराने सन्मानित झालेले विद्यालयातील क्रीडा शिक्षक बी.बी. आहेर यांचा शाल, पुष्पगुच्छ व श्रीफळ देऊन गौरव करण्यात आला.
    शिक्षक दिनानिमित्त आयोजित हा सत्कार सोहळा विद्यालयाचे मुख्याध्यापक संजय पाखले यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. याप्रसंगी मनसे उप तालुका अध्यक्ष भोलेनाथ चव्हाण, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष कृष्णा आडोळे हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
    कार्यक्रमात बोलताना मुख्याध्यापक संजय पाखले म्हणाले की, गेल्या अनेक वर्षांपासून आहेर सरांनी विद्यालयात क्रीडा क्षेत्राची मुहूर्तमेढ रोवून अनेक विद्यार्थ्यांना जिल्हा व राज्यस्तरीय स्पर्धांसाठी घडवले. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन शासनाने त्यांना क्रीडा सेवा पुरस्काराने गौरविले आहे, ही विद्यालयासाठी अभिमानाची बाब आहे.
      यावेळी मनसे उप तालुका अध्यक्ष भोलेनाथ चव्हाण यांनी आपल्या भाषणात आहेर सरांच्या कार्याचा गौरव करताना सांगितले की, क्रीडा आणि शिक्षण यांचा मेळ घालून विद्यार्थ्यांना राष्ट्रीय पातळीवर नेण्यासाठी आहेर सरांचे योगदान मोलाचे आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली भविष्यातही अधिकाधिक विद्यार्थी क्रीडा क्षेत्रात उज्ज्वल यश मिळवतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
    शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष कृष्णा आडोळे यांनी पालक व शाळेच्या वतीने आहेर सरांचे अभिनंदन केले व त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
    कार्यक्रमात शिक्षक, शिक्षिका, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यार्थ्यांनीही शिक्षक दिनानिमित्त गीत, भाषण सादर करून शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त केली. शेवटी आभार प्रदर्शन करून कार्यक्रमाची सांगता झाली.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने