दिंडोरी l प्रतिनिधी:-मडकीजांब येथे चाईल्ड सर्व्हायव्हल इंडिया, पर्नॉड रिकार्ड इंडिया फाऊंडेशन, मडकीजांब ग्रामपंचायत आणि मडकीजांब उपकेंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने विश्व पोषण माह कार्यक्रम उत्साहात आयोजित करण्यात आला.
कार्यक्रमादरम्यान वैद्यकीय अधिकारी डॉ. अमोल येवला आणि मडकीजांब उपकेंद्राच्या समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. सुनीता सुंठवाल यांनी पोषण, संतुलित आहार आणि निरोगी जीवनशैली याबाबत उपस्थितांना मार्गदर्शन केले. तसेच अल्ट्रा-प्रोसेस्ड फूड्सच्या (Ultra-Processed Foods) अतिसेवनामुळे आरोग्यावर होणाऱ्या दुष्परिणामांची माहिती देत अशा पदार्थांचे सेवन कमी करून शक्यतो टाळण्याचे आवाहन करण्यात आले.
यावेळी आयोजित करण्यात आलेल्या पोषण आहार स्पर्धेत गावातील महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. महिलांनी स्वतः तयार केलेले विविध पौष्टिक खाद्यपदार्थ सादर करून त्यांचे पोषणमूल्य आणि आरोग्यदायी फायदे याबाबत माहिती दिली. योग्य पोषण थाळी तयार करून सादर करणाऱ्या तीन महिलांची विजेते म्हणून निवड करण्यात आली.
महिलांचा उत्स्फूर्त सहभाग आणि कार्यक्रमाला मिळालेला सकारात्मक प्रतिसाद यामुळे गावामध्ये पोषण, संतुलित आहार आणि आरोग्यदायी आहाराच्या सवयींबाबत जनजागृती होण्यास मोठी मदत झाली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हेल्थ एज्युकेटर प्रियंका चव्हाण यांनी केले. यावेळी चाईल्ड सर्व्हायव्हल इंडियाचे प्रोजेक्ट मॅनेजर जितेंद्र अहिरे यांनी विश्व पोषण माहाचे महत्त्व स्पष्ट करत समुदायामध्ये संतुलित आणि पौष्टिक आहाराच्या सवयी विकसित करण्याची गरज व्यक्त केली.
कार्यक्रमाला चाईल्ड सर्व्हायव्हल इंडियाचे प्रोजेक्ट मॅनेजर जितेंद्र अहिरे ,मेडिकल ऑफिसर डॉ. अमोल येवला, फार्मासिस्ट पवन सोनवणे, हेल्थ एज्युकेटर प्रियंका चव्हाण आणि प्रवीण बैरागी उपस्थित होते.
तसेच मडकीजांबच्या सरपंच रोहिणी मोरे, उपसरपंच अनिल वडजे, ग्रामविकास अधिकारी समाधान शेवाळे, ग्रामपंचायत सदस्य आनंदा धुमणे, समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. सुनीता सुंठवाल, आरोग्य सेविका सविता तांबे, आशा कार्यकर्त्या शीतल वडजे व दीपाली गायकवाड तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.